अनिल ठाणेकर

ठाणे : घोडबंदर रस्त्यावरील वाहतुकीच्या दृष्टीने गायमुख घाट अत्यंत महत्त्वाचा असून त्याच्या कॉंक्रिटीकरणाचे काम वेगाने मार्गी लावावे, असे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी प्रशासनाला दिले आहेत. घाटातील कामासाठी वन विभागाची परवानगी आवश्यक असून ती डिसेंबर अखेरपर्यंत मिळाल्यास पुढील चार महिन्यात घाट रस्त्याचे कॉक्रिटीकरण करण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने देण्यात आली.

घोडबंदर रस्त्यावरील वाहतुकीच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी  महापालिकेसह विविध यंत्रणा, जस्टीस फॉर घोडबंदर रोड हे स्थानिक नागरिकांचे प्रतिनिधी यांची बैठक सप्टेंबर महिन्यात झाली होती. त्याचा पाठपुरावा करण्यासाठी गुरूवारी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. गायमुख घाट रस्ता येथील रस्त्याच्या दुरुस्तीविषयी अजूनही तक्रारी असून संपूर्ण रस्त्याचे योग्य पद्धतीने डांबरीकरण करण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली. दूचाकी वाहनांसाठी हा घाट मार्ग अजूनही धोकादायक असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासंदर्भात, भविष्यात कॉंक्रिटीकरण होणार आहे म्हणून आता रस्ता किरकोळ दुरुस्ती करून तसाच ठेवता येणार नाही. त्यामुळे तो सर्व वाहनांसाठी योग्य राहील अशी गुणवत्तापूर्ण दुरुस्ती करावी, असे आयुक्त राव यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रतिनिधींना सांगितले.घाट रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाचा कार्यादेश तयार असून वन विभागाच्या मान्यतेसाठी सुधारित प्रस्ताव सादर करण्यात आल्याची माहिती यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली. डिसेंबरअखेरपर्यंत ही परवानगी मिळाल्यास जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात घाट रस्त्याचे कॉंक्रिटीकरण पूर्ण करण्यात येईल, अशी माहितीही देण्यात आली.कापूरबावडी आणि कॅडबरी उड्डाणपूलाच्या दुरुस्तीचे काम रेंगाळले असल्याची तक्रार नागरिकांनी केली. त्यावर, कंत्राटदार आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यात त्यावर बोलणी सुरू असून तेही काम लवकरच पूर्ण होईल, असे स्पष्ट करण्यात आले.घोडबंदर रोडवरील वाहतूक समस्येवर तोडगा काढण्यासाठी महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, वाहतूक पोलीस, प्रादेशिक परिवहन विभाग, मेट्रो आदी यंत्रणा दक्ष आहेत. त्यांच्याकडून वेळोवेळी सहकार्य मिळत असल्याने बऱ्याच समस्या दूर झाल्या आहेत. चांगल्या समन्वयामुळे हे शक्य झाल्याची प्रतिक्रिया बैठकीच्या सुरुवातीला जस्टीस फॉर घोडबंदर रोडच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली.महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, पोलीस उपायुक्त (वाहतूक) पंकज शिरसाठ, प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील, उपायुक्त मनीष जोशी, मधुकर बोडके, शंकर पाटोळे, दिनेश तायडे, उपनगर अभियंता विकास ढोले आणि शुंभागी केसवानी, घोडबंदर रोडवर काम करणाऱ्या यंत्रणांचे समन्वयक आणि कार्यकारी अभियंता संजय कदम, वृक्ष अधिकारी केदार पाटील, जस्टिस फॉर घोडबंदर रोडचे प्रतिनिधी, मेट्रो, सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. वाहतूक पोलिसांच्या सहाय्यासाठी नेमण्यात आलेले वॉर्डन आणि बस चालक यांचे सध्या रस्ता सुरक्षेबाबत प्रशिक्षण सुरू असल्याचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाठ यांनी सांगितले. आवश्यकता असल्यास आणखी कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे. या वॉर्डनना काही ठिकाणी त्रास दिला जातो, वाहन चालक त्यांचे ऐकत नाहीत, अशी निरिक्षणे नागरिकांच्या वतीने मांडण्यात आली.स्थानिक अवजड वाहने, मुंबईकडून येणारी अवजड वाहने यांची वर्दळ बंदीच्या काळातही सुरू असते. तसेच, बाहेरील वाहने रोखून ठेवण्यावरही मर्यादा येत असल्याने या अवजड वाहनांबाबत कोणती व्यवस्था करायची यावर वाहतूक पोलीस विचार करत असल्याची माहिती उपायुक्त शिरसाठ यांनी दिली. आनंद नगर सिग्नल येथे एकूण ११ ठिकाणी रस्ते ओलांडले जातात. त्यामुळे सिग्नल असूनही वाहतूक संचलन नीट होत नाही. त्याकरता सिग्नलची जागा बदलावी अशी सूचना नागरिकांच्या वतीने करण्यात आली. त्यासंदर्भात, पालिकेचा विद्युत विभाग आणि वाहतूक पोलीस यांनी प्रत्यक्ष जागेवर पाहणी करून तोडगा काढावा, असे निर्देश आयुक्त राव यांनी केले. रस्त्याच्या कडेला उभ्या करण्यात आलेल्या बेवारस वाहनांची मोठी समस्या घोडबंदर परिसरात आहे. त्यावर उपाय करण्यासाठी महापालिका, प्रादेशिक परिवहन विभाग आणि वाहतूक पोलीस यांनी एकत्रितपणे मोहीम हाती घ्यावी, असे निर्देश आयुक्त राव यांनी दिले. सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडून ही वाहने हटविण्यात यावीत, असे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *