रेल्वे संरक्षण दलामुळे हरवलेल्या ४१४ मुलांची झाली घरवापसी
मुंबई: मध्य रेल्वेवर सुरक्षेची जबाबदारी पार पाडणाऱ्या रेल्वे संरक्षण दलाने (आरपीएफ) हरवलेल्या मुलांची घरवापसी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ऑगस्ट ते ऑक्टोबर २०२४ या कालावधीत आरपीएफने ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते मोहिमे’ अंतर्गत एकूण ४१४ मुलांनं त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचवले आहे. या मुलांमध्ये ३०६ मुले आणि १०८ मुलींचा समावेश आहे.
देशभरातील अनेक मुला- मुलींना शहराचे असलेले आकर्षण, कौटुंबिक कलह तसेच चांगल्या आयुष्याच्या शोधात कुटुंबीयांना न सांगता मुंबईत येतात. मुंबईतील अनेक रेल्वेस्थानकांवर ही मुले आरपीएफ कर्मचाऱ्यांना सापडतात. प्रशिक्षित आरपीएफ कर्मचारी या मुलांच्या अडचणी समजून घेतात आणि त्यांना त्यांच्या पालकांशी पुन्हा एकत्र येण्यासाठी सल्ला देतात. यंदा ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ अंतर्गत मध्य रेल्वेच्या आरपीएफ पोलिसांनी ऑगस्ट ते ऑक्टोबर या तीन महिन्यांच्या कालावधीत ४१४ मुलांची सुटका करून त्यांची घरवापसी केली.
या मुलांना सुरक्षित घरी पाठविण्यासाठी रेल्वे प्रशासन, आरपीएफ, जीआरपी आणि चाइल्डलाइन केंद्र समन्वयक एकत्रितपणे काम करत असून हरवलेल्या मुलांचे संगोपन, त्यांच्या आई-वडिलांचा शोध, त्यांचे समुपदेशन, त्यांचे जेवण सर्व गोष्टींची काळजी संस्थेकडून आणि प्रशासनाकडून घेण्यात येत आहे.
००००