मुंबई – भाजपाला काहीजण उघडपणे बिनशर्त पाठिंबा देतायेत तर काहीजण भाजपाच्या विरोधात लढण्याचं नाटक करून त्यांनाच छुपा पाठिंबा देतायेत. आता ही नाटके जनता ओळखते. त्यामुळे हुकुमशाहीविरोधात लोकशाही अशा या सरळ लढाईत जनता योग्य तो निर्णय घेईल असे विधान करीत उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे राज ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांवर निशाणा साधला.
राज ठाकरे यांनी आपली भुमिका बदलत भाजपाला दिलेल्या पाठींब्यावर उद्धव ठाकरे यांनी मिश्किल टिपणी केली. तसेच वंचित ठिकठीकाणी भाजपाविरोधात उमेदवार उभे करीत असले तरी मतविभाजनाचा फटका महाविकास आघाडीलाच बसून अंतिमता ते भाजपालाच फायद्याचे होईल असा धोका ही ठाकरे यांनी यावेळी अधोरेखीत केला.
उद्धव ठाकरे म्हणाले की, एकाधिकारशाही देशाला घातक आहे. हुकुमशाहाला पुन्हा स्वीकारणे घातक आहे. एककाळ असा होता, जेव्हा संमिश्र सरकार नको वाटायचे. परंतु अटलबिहारी वाजपेयी, नरसिंहराव, मनमोहन सिंग यांनीही उत्तम सरकार चालवलं. जर कालखंड पाहिला तर अपवाद वगळता संमिश्र सरकारच्या काळात देशाची प्रगती मजबूत झाली आहे. आम्हाला देश मजबूत हवा. सरकार संमिश्र पाहिजे. एका व्यक्तीच्या हाती संपूर्ण देश दिला तर तो देशाचा गळा घोटल्याशिवाय राहणार नाही असं त्यांनी म्हटलं.
आम्ही मविआच्या जागांची, उमेदवारांची घोषणा केली आहे. लवकरच एकत्रित सभा होतील. आता जागावाटप झालं आहे. मतभेद विसरून एकदिलाने लढण्यासाठी कार्यकर्त्यांना समजावणं त्या त्या पक्षाची जबाबदारी आहे असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.