बारामतीत नणंद विरुद्ध भावजय असा लढा निश्चित होऊन एक आठवड्याहून अधिक कालावधी लोटला आहे. नणंद सुप्रिया सुळे यांच्यासाठी त्यांचे तीर्थरूप दस्तुरखुद्द शरदराव पवार कंबर कसून मैदानात उतरले आहेत. त्यांच्यासोबत सुप्रियाजींच्या आत्या, चुलत बहिणी, चुलत भाऊ, वहिनी हे सर्वच मैदानात उतरले आहेत.
त्याचबरोबर भावजय सुनेत्रा पवार यांच्यासाठी त्यांचे पती अजित पवार हे कामाला लागलेले आहेत. त्यांना साथ देण्यासाठी मंत्रिमंडळातले त्यांचे सहकारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जीवाचे रान करत आहेत. इतरही कार्यकर्ते छातीला माती लावून दंड थोपटून सज्ज झाले आहेत.एकूणच या लढतीत आता रंगत येऊ लागलेली आहे.
लढत अशी रंगात येत असतानाच अजित पवार एका सभेत बोलताना बोलून गेले की सुरुवातीला तुम्ही पवार कुटुंबातील मुलाला म्हणजे मला लोकसभेत निवडून दिले, मग वडिलांना म्हणजेच शरद पवारांना विजयी केले ,त्यानंतर मुलगी म्हणजे सुप्रिया सुळे यांना विजयी केले. आता पवार घराण्यातल्या सुनेला म्हणजेच सुनेत्रा पवारांना विजयी करा. तुमचे मत पवार कुटुंबातच दिले जाणार आहे, आणि ज्या घड्याळावर तुम्ही शिक्का मारता त्या घड्याळालाच दिले जाणार आहे असे देखील अजितदादांनी स्पष्ट केले.
अजित पवारांच्या या वक्तव्यावर एका पत्र परिषदेत शरद पवार देखील प्रतिक्रिया देते झाले. त्यांनी प्रतिक्रिया दिली की जरी पवार घराण्यात मत दिले जाणार असले तरी मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार यात फरक असतोच. त्याचा मतदारांनी विचार करावा असेही त्यांनी सुचवले आहे.
शरद पवारांच्या या वक्तव्यावर राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. त्याचबरोबर महिला स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या संघटना आणि कार्यकर्त्यांनीही तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. या संदर्भात सुनेत्रा पवारांना प्रतिक्रिया विचारली असता काहीही न बोलता भरून आलेले डोळे पुसत काढता पाय घेतल्याचे माध्यमांवर दाखवले गेले आहे. या सर्व प्रकारामुळे राजकीय वर्तुळात चर्चा होणे हे सहाजिकच आहे.
भारतीय संस्कृतीत मुलगी आणि सून यांना बरोबरीचे स्थान दिलेले आहे. सून ही पराघरून आलेली असली तरी ती ही मुलगीच असते, आणि तिलाही मुलीसारखेच प्रेम द्यायचे असते, असे आपल्या संस्कृतीने मानले आहे. मात्र मधल्या काळात मुलीला मोठेपणा देत सुनेला दुय्यम स्थान देण्याचे प्रकारही घडताना दिसत आहेत.
याची झलक आपल्याकडे म्हटल्या जाणाऱ्या लोकगीतांमध्येही दिसून येते. विशेषतः आपल्याकडे बालवयात मुलींनी खेळायचा हादगा किंवा भोंडला किंवा विदर्भातील भुलाबाई या खेळात गाईल्या जाणाऱ्या गाण्यांमध्ये सुनेला दुय्यम स्थान देत मुलीला म्हणजेच नणंदेला वरचढ दाखवण्याचे प्रकार झालेले आहेत. आता माझा दादा येईल ग, दादाच्या मांडीवर बसिल ग, वहिनीच्या चुगल्या सांगीन ग, अशी गीते जुन्या पिढीतल्या महिलांना निश्चित आठवतील.
मात्र आज २१व्या शतकात स्त्रीला सन्मान देताना सून आणि मुलगी यांना बरोबरीचे स्थान दिले जावे असे पुरोगामी परिवारात रूढ झाले आहे. शरद पवार स्वतः पुरोगामी असल्याचा दावा करतात. त्यामुळे शरद पवार हे मुलगी आणि सून यांना बरोबरीचे स्थान देतील अशी सर्वांचीच अपेक्षा होती नव्हे ते देत असणारच अशी सर्वांची खात्री होती. मात्र मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार असा भेदभाव करून शरद पवारांनी आपले पुरोगामीत्व किती बेगडी आहे हेच अप्रत्यक्षपणे दाखवून दिले आहे.
मुलगी जन्माला आल्यावर पंधरा- वीस- पंचवीस वर्ष आपल्या माहेरी म्हणजेच आई-वडिलांसोबत काढत असते. योग्य वय झाले की जनरितीनुसार तिचे लग्न करून दिले जाते. लग्न करून ती ज्या कुटुंबात जाते त्या कुटुंबातलीच एक होते. आपले माहेरचे कुळाचे नाव, स्वतःचे नाव आणि स्वतःचे अस्तित्व हे सर्व काही माहेरीच सोडून ती सासरी येत असते. सासरच्या नव्या नावाने ती नवे आयुष्य सुरू करते आणि दुधात साखर मिसळून जावे तितक्या सहजपणे ती त्या सासरच्या घराला आपले मानते. सासरची मंडळीही तिला आपली मानून सर्व सूत्रे तिच्या हातात सोपवत असतात. त्याचवेळी त्या कुटुंबातली मुलगी मात्र लग्न होऊन दुसऱ्या घरी गेली की ती तिकडलीच झालेली असते. अर्थात काही कुटुंबात घर जावई ठेवून घेतले जातात तिथे या पद्धतीला अपवाद म्हणून बघितले जाते.
अजित पवारांच्या सुविद्य पत्नी सुनेत्रा पवार या जरी आतापर्यंत राजकारणात सक्रिय नव्हत्या तरी सामाजिक क्षेत्रात त्या कार्यरत राहिल्याच. बारामती मतदारसंघात त्यांचाही चांगला जनसंपर्क आहे. विशेष म्हणजे अजित दादांसोबत विवाहबद्ध झाल्यावर त्या पवार कुटुंबात पूर्णतः मिसळून गेलेल्या आहेत. अशावेळी त्यांना पित्यासमान असणाऱ्या त्यांच्या चुलत सासर्यांनी बाहेरची म्हणून त्यांची संभावना करावी हे त्यांना दुखाणारे ठरणारच. त्यामुळेच त्यांनी अश्रू भरले डोळे पुसत माध्यमांना प्रतिक्रिया देणे टाळले, हे ओघानेच आले. अर्थात त्यांचे मौन आणि अश्रूभरले डोळे हेच बोलके होते. त्यावरून त्यांच्या भावना काय ते स्पष्ट झाले आहे.
मुलगी आणि सून ही एकसारखीच असते, नव्हे सून ही देखील मुलगीच असते. मात्र या प्रकारात शरद पवारांनी मुलीवर प्रेम करताना सुनेला कमी लेखून आपण अजूनही पूर्णतः पुरोगामी झालो नाही तर फक्त पुरोगामीत्वाचा बुरखा पांघरलेलेच आहोत हे दाखवून दिले आहे. आज एका वृत्तवाहिनीवर एका विदुषीने प्रतिक्रिया देताना शरद पवारांना धृतराष्ट्र म्हणून टीका केली आहे. आमच्या मते ती यथार्थ आहे. आपली मुलगी सुप्रिया हिच्यासाठी कन्येसमानच असलेल्या सुनेला ती बाहेरची पवार आहे असे म्हणणे हे पवारांचा खरा चेहरा दाखवून देणारे आणि त्यांचा कथित पुरोगामित्वाचा बुरखा फाडणारे ठरले आहे. एकूणच या प्रकारात शरद पवारांनी आपले खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे हे दाखवून दिले आहे. शरद पवारांचा हा चेहरा देखील महाराष्ट्राच्या समोर आला हे चांगले झाले. आता तरी महाराष्ट्र या जाणत्या राजाला निश्चित ओळखून राहील हे नक्की.