आंतरशालेय खो-खो स्पर्धा

मुंबई : सरस्वती मंदिर हायस्कूलसच्या अमृत मोहत्सवी वर्षानिमित्त आंतरशालेय लंगडी व खो-खो स्पर्धांचे आयोजन केले आहे माहीमच्या सरस्वती मंदिर हायस्कूल, सेनापती बापट मार्ग येथे आयोजित आंतरशालेय खो-खो स्पर्धा सुरु आहेत.
पहिला उपांत्य सामना
सरस्वती मंदिर हायस्कूलने अहिल्या विद्या मंदिरचा १८-१० असा एक डाव आणि ८ गुणांनी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. सरस्वतीच्या खेळाडू रिया सिंगने उत्कृष्ट कामगिरी करत नाबाद १:४० मिनिटे खेळून ७ गुण मिळवले, तर राधिका कोंडुसकरने १:५० मिनिटे खेळत ३ गुणांची भर घातली. वैदवी बटावलेनेही प्रभावी खेळ करत नाबाद ३:१० मिनिटे खेळले आणि १ गुण मिळवला. दुसऱ्या बाजूला, अहिल्या विद्या मंदिरच्या अर्णवी शेंगाळेने आक्रमणात ६ गुण मिळवत एकहाती लढत दिली, मात्र तिला संघाकडून पुरेशी साथ न मिळाल्याने संघाला पराभव पत्करावा लागला.
दुसरा उपांत्य सामना
बंगाली एज्युकेशन सोसायटीने वाडीबंदर एमपीएस स्कूलवर १५-०४ असा एक डाव आणि ११ गुणांनी विजय मिळवला. बंगाली संघाकडून कार्तिकी कानसेने ५:३० मिनिटे खेळत ३ गुण मिळवले, सिद्धी शिंदेने ५:३० मिनिटांत ४ गुणांची कमाई केली, तर अनघा पन्हाळेने १:२० मिनिटे खेळत २ गुण मिळवले. त्यांच्या प्रभावी खेळामुळे संघाने अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. वाडीबंदर एमपीएस स्कूलकडून निधी शिगवण आणि अंकिता वाकोडे यांनी प्रत्येकी १ गुण मिळवला, परंतु संघाची एकत्रित कामगिरी अपयशी ठरली. आता अंतिम फेरीत सरस्वती मंदिर हायस्कूल आणि बंगाली एज्युकेशन सोसायटी यांच्यात चुरस पाहायला मिळेल.
००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *