शहरात पारा १०.५ अंशावर, हंगामातील निचांकी तापमानाची नोंद

 

हरिभाऊ लाखे
नाशिक: राज्यातील शहरांच्या तापमानाचा पारा सातत्याने खाली येत असताना शहरात गुरुवारी किमान १०.५ तर कमाल २७.४ तापमानाची नोंद करण्यात आली. निफाडचा पारा गुरुवारी पहाटे अवघ्या ८ अंश सेल्सिअसपर्यंत घसरला होता. यंदाच्या हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
नाशिकसह उत्तर महाराष्ट्रासाठी पुढील २४ तासांकरीता थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आल्याची माहिती हवामान विभागाने दिली अहे. तर पुढील दोन ते तीन दिवस वातावरणातील गारठा कायम राहणार आहे.
शहरात गुरुवारी किमान १०.५, तर कमाल २७.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. बुधवारी किमान १०.६, तर कमाल २७.५ अंश सेल्सिअस आणि मंगळवारी किमान १०.८, तर कमाल २८.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रात थंडी वाढत आहे.
राज्यात नाशिकच्या खालोखाल अहिल्यानगर आणि पुण्यात नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. बुधवारी अहिल्यानगरमध्ये ९.४, तर पुण्यात ९.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. तापमानाचा पारा घसरल्याने नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिल्या आहेत. जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातही १२.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
निफाडचा पारा घसरला
निफाड : गेल्या तीन-चार दिवसांपासून निफाड तालुक्यात थंडीचा पारा सातत्याने घसरत असून, गुरुवारी कुंदेवाडी येथील निफाड गहू संशोधन केंद्रात ८ अंश सेल्सिअस इतक्या कमी निच्चांकी तापमानाची नोंद झाली. राज्यातील निफाड येथे नीचांकी तापमान होते. गेल्या ३ ते ४ दिवसांपासून निफाड तालुक्यात थंडी वाढण्यास सुरुवात झाली आहे. थंडीपासून संरक्षण करण्यासाठी नागरिकांनी शेकोट्या पेटवल्या होत्या. कडाक्याच्या थंडीने सकाळी भरणाऱ्या शाळांमध्ये उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या गुरुवारी मात्र चांगलीच वाढली होती. निफाड तालुक्यात थंडीचे प्रमाण वाढत असल्याने द्राक्ष बागांच्या शेंड्यांच्या वाढीवर परिणाम होईल. मावा, तुडतुडे यांचा प्रादुर्भाव वाढला आहे.
००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *