भाजपनंतर आता शिवसेना शिंदे गटाची मोर्चेबांधणी

 

ठाणे : राज्यात महायुतीला रेकॉर्डब्रेक यश मिळाले असले तरी सध्या मुख्यमंत्रिपदावरून जोरदार संघर्ष सुरू आहे. या संघर्षाचे पडसाद आगामी महापालिका निवडणुकांमध्ये उमटण्याचे स्पष्ट संकेत आतापासूनच मिळत आहेत. एकीकडे भाजपची ताकद वाढवण्यासाठी सदस्य मोहीम सुरू झाली आहे, तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटानेही ‘युवासेना एकसाथ, महापालिकेतही एकनाथ’ असा नारा देत आता मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत महायुतीची शक्यता धूसर आहे. ठाण्याची शतप्रतिशत सुभेदारी मिळवण्यासाठी शिवसेना आणि भाजपमध्येच प्रमुख लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचा धुरळा शांत झाला आहे. ठाणे जिल्ह्यात महायुतीने १८ पैकी १६ जागांवर आपला झेंडा फडकवला आहे. जिल्ह्यात भाजपचे नऊ, तर शिवसेना शिंदे गटाचे सहा आमदार निवडून आले आहेत. महायुतीसाठी हे मोठे यश असले तरी निवडणुकांदरम्यान शिवसेना आणि भाजपमध्ये स्थानिक पातळीवर मोठा बेबनावही पाहायला मिळाला होता. जागावाटपावरून ते प्रचारापर्यंत हा तणाव होता, पण विधानसभेच्या ऐन निवडणुकीत या दोन्ही पक्षाने सर्व हेवेदावे बाजूला ठेवून एकदिलाने काम केले. त्या यशाचे फलीत त्यांना मिळाले आहे, पण सध्या राज्याच्या राजकारणात मुख्यमंत्रिपदावरून जे सुरू आहे, त्यामुळे ठाण्यातील शिवसेना शिंदे गटात कमालीची नाराजी पसरली आहे. याचा वचपा आगामी महापालिका निवडणुकीत काढण्याचा एकप्रकारे संकल्प केल्याचे समजते.
ठाणे महापालिकेची अखेरची निवडणूक २०१७ मध्ये झाली होती. त्यानंतर २०२२ मध्ये कार्यकाळ संपल्यामुळे ती विसर्जित झाली. कोव्हिडमुळे आधी निवडणूक लांबणीवर पडली, तर नंतर ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुढे आल्याने गेल्या तीन वर्षांपासून पालिकेची निवडणूक खोळंबली आहे. आता सत्तास्थापनेनंतर पालिका निवडणुका होतील, या आशेने लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये झोकून दिल्याने सर्व माजी नगरसेवकांसमोर आशेचा किरण दिसू लागला आहे, पण त्याचवेळी जर पॅनलपद्धतीने निवडणुका झाल्या आणि त्यातही महायुती-आघाडी अशी शक्यता निर्माण झाल्यास आपल्या वाट्याला काय येणार, याची चिंताही सतावू लागली आहे. वास्तविक ठाणे महापालिकेवर गेल्या २५ वर्षांपासून शिवसेनेची सत्ता आहे. शिवसेनेने सत्तेचे पहिले यश ठाण्यातून मिळवले होते. त्यामुळे ठाण्यावर शिवसेनेचे वर्चस्व कायम राहिले आहे. राज्यात भाजपसोबत युती असली तरी ठाण्यात शिवसेनेचा नेहमीच वरचष्मा राहिला आहे. त्यामुळे सत्तेत शिंदे गटाला भाजपची भागीदारी नको असल्याचीही चर्चा सुरू आहे.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *