ठाणे : डॉ. राजेश मढवी स्पोर्ट्स असोसिएशन आणि दैवेज्ञ क्रिकेट क्लब आयोजित पाचव्या अर्जुन मढवी महिलांच्या क्रिकेट स्पर्धेला आजपासून (सोमवार) सुरुवात होत आहे. यंदा प्रथमच स्पर्धेतील सामने मर्यादित ४० षटकांचे खेळवले जाणार असून मुंबई क्रिकेट संघटनेने आगामी राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धांकरता दिलेला निवड चाचणीचा दर्जा हे स्पर्धेचे वैशिष्ट्य असल्याचे स्पर्धेचे प्रमुख आयोजक डॉ. राजेश मढवी यांनी सांगितले.
स्पर्धेबाबत माहिती देताना डॉ राजेश मढवी म्हणाले महिला क्रिकेटला पुढावा देण्यासाठी आयोजीत करण्यात येणारी ही स्पर्धा गेली चार वर्षे टी -२० प्रारूपात खेळवण्यात येत होती. पण, यावेळी मुंबई क्रिकेट संघटनेने दिलेल्या निर्देशानुसार सामने ४० षटकांची बाद पध्दतीने खेळवण्यात येतील. या स्पर्धतून यंदाच्या मोसमातील राष्ट्रीय स्पर्धेकरता मुंबई क्रिकेट संघटनेचे १९ वर्ष वयोगट आणि वरीष्ठ महिला गटाचे प्रातिनिधिक संघ निवडले जाणार आहेत. मुंबईतील आघाडीच्या बारा संघांना स्पर्धेत प्रवेश देण्यात आला आहे. त्यात गतविजेते राजावाडी क्रिकेट क्लब, उपविजेते रिगल क्रिकेट क्लबसह माटुंगा जिमखाना, स्पोर्टिंग यूनियन क्लब, दिलीप वेंगसरकर फाऊंडेशन, दहिसर स्पोर्ट्स क्लब, व्हिक्टरी क्रिकेट क्लब, भारत क्रिकेट क्लब, पालघर डहाणू तालुका स्पोर्ट्स असोसिएशन, ग्लोरियस क्रिकेट क्लब, स्पोर्ट्स फिल्ड क्रिकेट क्लब, पय्याडे क्रिकेट क्लब आदी संघाचा समावेश आहे. माजी आंतराष्ट्रीय क्रिकेटपटू आणि मुंबई क्रिकेट संघटनेच्या महिला संघाच्या विद्यमान निवड समिती प्रमुख लाया फ्रान्सिस यांच्या हस्ते स्पर्धेचे उदघाटन होणार आहे. निवड चाचणीचा दर्जा असल्याने स्पर्धेतील सामने रंगतदार होतील त्यामुळे ठाणेकर क्रिकेटप्रेमींनी मोठया संख्येने उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन डॉ राजेश मढवी यांनी केले आहे.
0000