ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांचे भाकित
ठाणे: लोकसभा निवडणुकीच्या काळात हिंदूंमध्ये मतदानाबाबत उदासिनता होती. मात्र, बांगलादेश, सिलीगुडी आणि सिमला येथील हिंदूवरील अन्यायाच्या घटनांनंतर हिंदू अस्मिता जागी झाली. हिंदू धर्मियांना आपल्या उदासिनतेबाबत पश्चाताप झाल्यानंतर सुरुवातीला हरियाणा व आता महाराष्ट्रातील निकाल लागले. यापुढील निवडणुकांतही हिंदू अस्मितेचे धमाके फुटत राहतील, असे भाकीत ज्येष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर यांनी येथे व्यक्त केले.
भाजपाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष व विश्वास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संजय वाघुले यांच्या वतीने राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर यांचे `कारणं महायुतीच्या विजयाची, भाजपाच्या यशाची’ या विषयावर शुक्रवारी व्याख्यान पार पडले. त्यावेळी श्री. तोरसेकर बोलत होते. नौपाड्यातील उमा निळकंठ व्यायामशाळेलगतच्या हितवर्धिनी सभेच्या मैदानात झालेल्या या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांसह शेकडो ठाणेकरांनी गर्दी केली होती. या कार्यक्रमात भाऊ तोरसेकर यांच्या हस्ते सामाजिक कार्यकर्ते व हिंदुत्वाचे अभ्यासक अजय जगताप यांनी `लव्ह जिहाद’वर लिहिलेल्या `व्हायरस’ पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
लोकसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेला २४० हा आकडा पंतप्रधान नरेंद्र मोदींना खुपला नाही. पण तो हिंदूंना खुपला. त्यानंतर हळूहळू हिंदू धर्मीय संघटीत होत गेले, असे प्रतिपादन भाऊ तोरकसेकर यांनी केले.
महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत भाजपाने मेहनत केली नाही. तर महाविकास आघाडीने संपूर्णपणे ताकद लावली. त्यामुळे त्यावेळी भाजपाची हाराकिरी झाली होती. महायुती व महाविकास आघाडीच्या मतांमध्ये केवळ ०.०३ टक्क्यांचा म्हणजे दोन लाख मतांचा फरक होता. महाविकास आघाडीतील काही पक्षांना लोकसभा निवडणुकीच्या वेळी स्वारस्य नव्हते. त्यामुळे त्यांची मते महाविकास आघाडीकडे वळविण्यात आली. मात्र, ते विधानसभा निवडणुकीत स्वतंत्र लढल्यास महाविकास आघाडीचा पराभव निश्चित होता. लोकसभेच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सातत्याने भाजपाचा पराभव झाला नसल्याचे सांगण्यात येत होते. परंतु, ते ध्यानात घेतले गेले नाही, याकडे भाऊ तोरसेकर यांनी लक्ष वेधले. तसेच २०१९ पासून देवेंद्र फडणवीस यांची पाच वर्ष यथेच्छ टिंगल केली गेली. मात्र, त्यांनी संयम बाळगून आज इतर सर्वांना चेष्टेचा विषय केले आहे, असा टोला श्री. तोरसेकर यांनी मारला.
सध्या सक्षम विरोधी पक्ष नसल्यामुळे राजकारणाचा `चुथडा’ झाला आहे. एकेकाळी महाराष्ट्रात अभ्यासू विरोधी आमदारांची फळी होती. परंतु, आता ती फळी संपल्यामुळे लोकशाहीपुढे आव्हान निर्माण झाले आहे, अशी खंत श्री. भाऊ तोरसेकर यांनी व्यक्त केली.
विश्वास सामाजिक संस्थेच्या वतीने भाऊ तोरसेकर यांचे संजय वाघुले व संस्थेच्या सदस्या वृषाली वाघुले यांच्याकडून स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मकरंद मुळे यांनी केले.
