ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रात, शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत रविवार 8 डिसेंबरला उपराष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिम राबविण्यात येणार आहे. सर्व बालकांना विहित वयात प्राथमिक लसीकरण, नियमित एएफपी सर्व्हेक्षण आणि पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेतंर्गत 0 ते 5 वर्षाखालील सर्व बालके संरक्षित करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. राज्यात सन 1995 पासून दरवर्षी पल्स पोलिओ मोहिम राबविण्यात येते.

ठाणे महापालिका क्षेत्रात, एकूण 1278 बूथवर ही लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेचे 2556 कर्मचारी कार्यरत असतील. गेल्यावेळी झालेल्या मोहिमेत ठाणे महापालिका क्षेत्रात, 0 ते 05 या वयोगटातील 01 लाख 78 हजार 824 बालकांना लस देण्यात आली होती.

ठाणे महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागातंर्गत कार्यरत सर्व आरोग्य केंद्रामध्ये ही लस मोफत उपलब्ध करण्यात आली आहे. त्याचा लाभ पालकांनी 0 ते 5 वर्षापर्यंतच्या सर्व बालकांना द्यावा, असे आवाहन ठाणे महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *