नवी मुंबइ : एसएनडीटी विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ लाईफ लॉँग लर्निंग अँड एक्स्टेन्शन आणि डिपार्टमेंट ऑफ सोशल वर्क यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिवस आणि शहीद दिन साजरा करण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन करताना विभाग संचालक डॉ. प्रभाकर चव्हाण यांनी सांगितले की, संविधान समजून घेऊन समाजसेवकांनी त्यातील आपली भूमिका ओळखून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी कार्य करणे महत्वाचे आहे. त्याचबरोबर त्यातून समाजाच्या प्रगतीसाठी आणि विकासासाठी योगदान कसे देता येईल, याबाबतही विचार केला पाहिजे. महिला तसेच उपेक्षित घटकांसाठीही विशेष कार्य करण्याची तळमळ अंगीकारली पाहिजे.
सहाय्यक प्राध्यापक विकास जाधव यांनी सांगितले की, महिलांना समान संधी देताना त्यांचा चा राजकारणातीलदेखील सहभाग वाढण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले होते की, तुम्ही माझी मंदिरे बांधण्यापेक्षा माझा अनुनय करा, संविधानातील मूल्ये अंगीकृत करा, याची माहिती सहाय्यक प्राध्यापक डॉ. वाघमारे यांनी दिली.
यावेळी विभागातील विद्यार्थीनींनीही मनोगत व्यक्त केले. काहींनी गीते गायली, कविता वाचन केले. याप्रसंगी संविधान प्रस्तावनेचे वाचनदेखील करण्यात आले. देशाच्या सुरक्षिततेसाठी आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या शहिदांचे स्मरण करून त्यांना श्रद्धांजलीदेखील अर्पण करण्यात आली.
0000