डहाणू : पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागाच्या सर्वांगीण विकासासाठी डहाणू- नाशिक या रेल्वे मार्गाची, अनेक दशकांची मागणी आहे. सदरची मागणी काही वर्षासाठी कालबाह्य झाली होती. मात्र, खासदार डॉ.हेमंत सवरा यांनी ही मागणी पुन्हा पुर्नजीवीत केली आहे. या रेल्वे मार्गाचे पुर्नसर्व्हेक्षण होणार आहे.

त्यासाठी  2  कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. या सर्व्हेक्षणात आदिवासी तालुक्यांचा समावेश करण्याची मागणी खासदार डॉ.हेमंत सवरांनी, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे. त्यामुळे डहाणू- नाशिक रेल्वेमार्गाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.  डहाणू- नाशिक रेल्वे सुरू करण्याची मागणी, या भागाचे पहिले तत्कालीन खासदार, जव्हार संस्थान चे राजे यशवंतराव मुकणे यांनी  1950  मध्ये केली होती. त्यानंतर या मागणीचा पाठपुरावा दिवंगत खासदार अॅड चिंतामण वनगा यांनी दोन तीन दशके केला आहे.

दरम्यानच्या काळात तत्कालीन रेल्वे मंत्री राम नाईक यांच्या कार्यकाळात डहाणू- नाशिक रेल्वे मार्गाचे सर्व्हेक्षण करण्यात आले होते. त्यामुळे डहाणू- नाशिक रेल्वे सुरू होण्याची आशा निर्माण झाली होती. मात्र, नंतरच्या काळात या रेल्वे मार्गाची मागणी कालबाह्य झाली होती. आता पुन्हा पालघर चे खासदार डॉ.हेमंत सवरांनी डहाणू- नाशिक रेल्वे मार्गाच्या मागणी ला पुर्नजीवीत केले आहे. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाने या रेल्वे मार्गाच्या पुर्नसर्व्हेक्षणाला परवानगी दिली आहे. त्यासाठी दोन कोटी रूपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे, त्यामुळे डहाणू- नाशिक रेल्वे मार्गाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यामुळे केंद्रिय रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांची भेट घेऊन खासदार डॉ.हेमंत सवरा यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

आदिवासी भागाच्या सर्वांगीण विकासासाठी रेल्वे मार्गाची गरज……

आदिवासी भागात खरीप पीकाव्यतिरीक्त अन्य ऊत्पन्नाचे साधन नाही. त्यामुळे येथील आदिवासी, रोजगारासाठी शहराकडे स्थलांतरीत होतात. या भागात कारखानदारी अथवा औद्योगिक वसाहत नाही. स्थानिक ठिकाणी महिला बचत गटांकडून उत्पादित अथवा तयार केलेल्या मालाला बाजारपेठ ऊपलब्ध होत नाही. शिक्षीत तरूणांना रोजगार नाही. त्यामुळे या भागात रेल्वे मार्ग झाल्यास, सर्व सुविधा तसेच रोजगार निर्मिती होणार आहे. त्यामुळे या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी डहाणू- नाशिक रेल्वे मार्गाची गरज आहे.

पुर्नसर्व्हेक्षणात आदिवासी तालुक्यांचा समावेश करण्याची मागणी

डहाणू- नाशिक रेल्वे मार्गाचे सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. त्यासाठी दोन कोटी रूपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. या सर्व्हेक्षणात मोखाडा, जव्हार आणि विक्रमगड या तीन आदिवासी तालुक्यांचा समावेश करण्यात यावा. या तालुक्यातील मुख्य बाजारपेठांलगत सदरचा रेल्वे मार्ग व्हावा, तसे सर्व्हेक्षण करावे अशी मागणी, रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे. त्यामुळे या भागाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल.

डॉ. हेमंत सवरा, खासदार पालघर.

००००

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *