शिवसेना नेते विनायक राऊत यांचे वक्तव्य

ठाणे : विधानसभा निवडणुकांमध्ये विरोधकांनी यंत्रणेचा वापर करून विजय मिळवला, हे लपून राहिलेले नाही. त्यामुळे आता झालेला पराभव विसरुन कामाला लागले पाहिजे. कारण, गुजरातच्या लबाडांचे लक्ष ठाणे, मुंबई महापालिकेवर असल्याने सर्वांनी जागृत रहा आणि कामाला लागा असे आवाहन शिवसेना (उबाठा) पक्षाचे नेते विनायक राऊत यांनी ठाण्यातील पदाधिकारी – कार्यकर्त्यांना केले.
ठाणे शहर, कोपरी पाचपाखाडी आणि ओवळा – माजिवडा विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी, महिला आघाडी आणि युवासेना कार्यकर्त्याचा मेळावा ठाण्यातील खारकर आळी येथील एनकेटी महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. शिवसेना नेते विनायक राऊत यांनी मेळाव्याला संबोधित करत, नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमधील पराभव विसरुन आगामी महापालिका निवडणुकीसाठी सज्ज व्हा, असे आवाहन पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केले. ते पुढे म्हणाले, चोरांच्या तावडीतून महाराष्ट्र सोडायचा असेल तर, एकजुटीने काम करा. महापालिका निवडणुका कधीही लागू द्या आतापासूनच कामाला लागा आणि ठाणे महापालिकेवर हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचाच भगवा फडकवा असे आवाहन देखील विनायक राऊत यांनी शिवसैनिकांना केले. या निवडणूकीत पैसा आणि यंत्रणेचा वापर कसा झाला हे सर्वांनी पाहिले. विरोधकांनी या निवडणूकीत सरळ मार्गे विजय मिळवलेला नाही. त्यामुळे ही लोक म्हणजे सत्तेला चिकटलेली गोचीड आहे, अशी टीका देखील राऊत यांनी केली. तसेच शिवसेना संपलेली नाही आणि संपवणाऱ्यांची अवलाद देखील जन्माला आली नाही, त्यामुळे घाबरू नका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभे रहा असे आवाहन विनायक राऊत यांनी उपस्थितांना केले.
यावेळी शिवसेना नेते राजन विचारे, अर्थतज्ञ आणि राजकीय विश्लेषक विश्वास उटगी, ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, प्रवक्ते अनिश गाढवे, शहरप्रमुख प्रदीप शिंदे, उपजिल्हाप्रमुख कृष्णकुमार कोळी, सुनील पाटील, सहसचिव विश्वास निकम, ठाणे शहर समन्वय संजय तरे, संपर्कप्रमुख महेश नेणे, काँगेसचे जेष्ठ नेते मधु मोहिते, ठाणे जिल्हा महिला आघाडी संघटिका रेखा खोपकर, उपजिल्हा संघटिका संपदा पांचाळ, महेश्वरी तरे, आकांक्षा राणे यांच्यासह शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
ईव्हीएममुळे विरोधकांचा विजय झाला आहे. त्यामूळे खचून जाऊ नका, ठाणे महापालिकेवर हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांचा भगवा फडकवायला तयार रहा, असे आवाहन यावेळी शिवसेना नेते राजन विचारे यांनी उपस्थित शिवसैनिकांना केले. तर, ही निवडणूक आपल्याला खूप काही शिकवून गेली. जेव्हा प्रचार करताना आम्ही फिरत होतो. तेव्हा ठाणेकर जोरदार स्वागत करत होते. अनेक पदाधिकाऱ्यांवर प्रचंड दबाव दिसून आला. मात्र, यामधून समजले हे ठाणे शिवसेनेचे होते आणि पुढे देखील शिवसेनेचेच राहील, असे मत शिवसेना (उबाठा) पक्षाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *