विश्वनाथ भोईरांचा माजी आमदार राजू पाटलांना टोला
डोंबिवली : ईव्हीएममशीन मुद्द्याकडे दुर्लक्ष करण्यासाठी सध्या भाजपा शिंदे यांची राजकीय खेळी सुरु असल्याची टिका मनसे नेते तथा माजी आमदार राजू पाटील यांनी केली आहे. या टिकेला आता शिवसेना शिंदे गटाचे कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी ठणकावून उत्तर देत सांगितले आहे की राजू पाटील जिंकले असते तर त्यांनी हा मुद्दा उचलला नसता. ते पडले तसेच त्यांच्या विरोधात आम्ही लढलो म्हणून हा आकस असू शकतो. त्यांच्याकडून ही अपेक्षा नाही. परंतू आता आम्ही दणकून निवडून आलो आहोत, तर ठणकावून उत्तर देतो असे भोईर म्हणाले आहेत.
विधानसभा निवडणूकीच्या निकालानंतर विरोधकांनी ईव्हीएममशीन वरुन सत्ताधाऱ्यांविरोधात मोहीम सुरु केली आहे. विविध मतदारसंघातून विरोधी उमेदवारांनी व्हीव्हीपॅट मधील मत नोंदणीची तपासणी करण्याची मागणी केली आहे. कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राजेश मोरे हे निवडणूक जिंकले आहेत. येथे शिवसेना ठाकरे गटाचे सुभाष भोईर व मनसेचे राजू पाटील यांचा पराभव झाला आहे.
66 हजारांच्या मताधिक्याने विजय झाला आहे. याठिकाणी राजू पाटील व सुभाष भोईर यांनी जिल्हा प्रशासनाकडे येथील व्हीव्हीपॅट मशीनमधील मत मोजणीसाठी अर्ज केला आहे. तसेच राज्यातील सत्तातरणावरुन सध्या भाजपा आणि शिंदे गटात सुरु असलेले राजकीय नाट्यावर मनसे माजी आमदार राजू पाटील यांनी भाष्य केले आहे. माजी आमदार पाटील म्हणाले, ईव्हीएमच्या मुद्याकडे दुर्लक्ष करण्यासाठी सध्या काय राजकीय घडामोडींना सुरुवात झाली आहे.
मुख्यमंत्र्यांना ताप काय आला, ते दरे गावात जाऊन काय बसले..शेवटी यांना बीजेपी सांगेल तेच करायचे आहे.. ईव्हीएम वरून लक्ष हटवण्यासाठी हे सर्व सुरू असल्याचा संशय येतोय. कल्याण ग्रामीण मतदारसंघात एकूण 65 हजार मतदान वाढले आणि 66 हजार मतांनी शिंदे गटाचे राजेश मोरे विजयी झालेत.. वाढलेलं सगळंच मतदान त्यांनाच मिळालं का ?? असा सवाल मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी केला आहे.एकूणच ही सर्व परिस्थिती संशयास्पद असल्याचा आरोप करत व्हीव्हीपॅट मशीन मधील मते मोजण्याकरीता आठ लाख रुपये भरले आहेत असे पाटील यांनी म्हटले आहे.
0000