ठाणे : ठाणे महापालिका परिवहन (टीएमटी) विभागाने विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. गेल्या अकरा महिन्यांत ६ हजार ९७५ प्रवाशांवर कारवाई करून त्यांच्याकडून १२ लाख १४ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ठाणे परिवहन विभागाकडून विना तिकीट प्रवास करणाऱ्यांवर वारंवार कारवाई केली जात असल्याची माहिती ठाणे परिवहन विभागाकडून देण्यात आली.
ठाणे शहरातील विविध मार्गांसह मुलुंड, बोरिवली, मिरा-भाईंदर अशा काही शहरांमध्ये ठाणे परिवहन विभागाच्या टीएमटी बस गाड्या धावतात. या बसगाड्यांमधून दिवसाला हजारोच्या संख्येने प्रवासी प्रवास करतात. प्रत्येक मार्गाच्या अंतरानुसार तिकीट दर ठरलेले असतात. बसमधील वाहक प्रवाशांकडून भाडेदर आकारुन तिकीट देतात. परंतू, अनेकदा बसमध्ये गर्दी असल्यामुळे काही प्रवासी लबाडीने वाहकाची नजर चूकवून तिकीट काढत नाहीत. गेल्या वर्षभरात विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढल्याचे दिसत आहे. अशा प्रवाशांवर लक्ष ठेवण्यासाठी शहरातील विविध बस थांब्यावर तिकीट तपासणी करणारेे अधिकारी उभे असलेले दिसतात. तर, अनेकदा तिकीट तपासणी करणारे अधिकारी बस मध्ये देखील चढतात. यांच्याकडून प्रवाशांच्या तिकीटांची तपासणी केली जाते. या तपासणी दरम्यान एखादा प्रवासी विना तिकीट आढळून आल्यास त्यावर ताटकाळ दंडात्मक कारवाई केली जाते. त्या प्रवाशाकडून प्रवासी भाडेदरासह २०० रुपये दंड आकारण्यात येतो. गेल्या अकरा महिन्यात विना तिकीट प्रवास करणाऱ्या ६ हजार ९७५ प्रवाशांवर ठाणे परिवहन विभागामार्फत कारवाई करण्यात आली असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. या प्रवाशांकडून ६८ हजार ५८४ रुपये भाडेदर वसूली करण्यात आली आहे. तर, १२ लाख १४ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याचे ठाणे परिवहन विभागाकडून आलेल्या अहवालातून समोर आले आहे.
कोट
प्रवाशांनी विना तिकीट प्रवास करु नये असे वारंवार आवाहन करण्यात येते तरी देखील काही प्रवासी विना तिकीट प्रवास करतात. असे प्रवासी आढळून आल्यास त्यांच्या ताटकाळ दंडात्मक कारवाई केली जाते.भालचंद्र बेहेरे, वाहतूक व्यवस्थापक, ठाणे परिवहन विभाग
०००००
