सिंधुदुर्ग :बहुचर्चित आणि ग्रामस्थ ज्याची आतुरतेनं वाट पाहतात अशी संस्थान आचरे गावची ‘ गावपळण ‘ आता १५ डिसेंबरला होणार आहे.
काल देवदिवाळीच्या दिवशी रामेश्वराच्या कौल प्रसादाने ही तारीख ठरली.दर चार-पाच वर्षांनी ‘ गाव पळणीचे वर्ष आले की ग्रामस्थ व बारा – पाच मानकरी रामेश्वर मंदिरात जमतात आणि कौलप्रसाद घेतात.त्यानुसार आता दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी १५ डिसेंबर पासून चार दिवस ही गावपळण होणार आहे.त्या दिवशी दुपारी तोफांच्या आणि नौबतीच्या इशाऱ्यावर सर्व आचरावासी गाव सोडण्यास सुरुवात करतील.
पूर्वापार चालत आलेल्या परंपरेनुसार त्यादिवशी दुपारपासून चार दिवस संपूर्ण गाव,आचरावासी,चार दिवस लागणारं अन्न – धान्य,अंथरूण – पांघरूण,इतर साहित्य, गुरे व अन्य पाळीव प्राण्यांसह वेशीबाहेर उभारण्यात येणाऱ्या राहुट्यात सहजीवनाचा आनंद घेत तीन दिवस व तीन रात्र आनंदात घालवणार आहेत.चौथ्या दिवशी पुन्हा गावात परतण्यासाठी देवाचा कौल घेण्यात येणार आहे. आचरे हे बारा वाड्यांचे गाव असून गावची लोकसंख्या सुमारे ४,५०० इतकी आहे. या गावपळणीत भाग घेण्यासाठी मुंबईकर चाकरमानीही सहभागी होत असतात.या अगोदर डिसेंबर, २०१९ मध्ये गावपळण झाली होती.
000000