‘धर्मराज्य पक्षा’चे सहसचिव नरेंद्र पंडित यांचे ठामपा आयुक्त सौरव राव यांना पत्र
ठाणे : स्वच्छतारक्षकांच्या आरोग्यासोबतच, सर्वसामान्य ठाणेकर नागरिकांच्याही आरोग्याची प्राधान्याने काळजी घ्यावी, अशी मागणी, ‘धर्मराज्य पक्षा’चे सहसचिव नरेंद्र पंडित यांनी, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरव राव यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे.
ठाणे शहरातून रोज लाखो टन कचरा, शहराच्या विविध प्रभागांतून गोळा केला जातो. ठाणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत याचे नियोजन केले जाते. सद्यस्थितीत ठाणे शहरातील स्वच्छतेसंदर्भात, समाधानकारक परिस्थिती असली तरी, ज्या वाहनांतून कचरा गोळा केला जातो किंवा वाहून नेला जातो, त्या वाहनांच्या स्वच्छतेबाबत मात्र, ‘आनंदी-आनंद’ असून, ठामपाच्या कचरा गोळा करणाऱ्या वाहनांची अत्यंत दुरवस्था झालेली पहावयास मिळत आहे. यातील बहुतांश वाहने अस्वच्छ असतात आणि या वाहनांतून कचरा टाकून दिल्यानंतरही, त्यामध्ये कचरा तसाच चिकटलेला दिसून येतो. परिणामी, गाडी कचऱ्याने भरलेली असो वा नसो, अस्वच्छतेमुळे या वाहनांतून कायमस्वरुपी दुर्गंधी येतच असते. याचा विपरीत परिणाम हा, अशा कचरावेचक वाहनांवर कार्यरत असणाऱ्या कामगारांच्या आरोग्यावर होत असतो. “कचरा गोळा करणारे कामगार हे, डॉक्टरांप्रमाणेच काम करीत असतात; कारण, ते स्वच्छतारक्षकाच्या भूमिकेतून, नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवत असतात!” अशाप्रकारचे विधान, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरव राव यांनी काही महिन्यांपूर्वी केले होते, याच पार्श्वभूमीवर ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून, ठाणे शहरातील कचरा गोळा करणाऱ्या वाहनांच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधले आहे. दरम्यान, ठाणे शहरातील कचरा गोळा करुन, शहर स्वच्छ ठेवणाऱ्यांच्या वाहनांची झालेली दुरवस्था तर, ठामपाचे आयुक्त आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांची वाहने टापटीप असणे, हा विरोधाभास ठाण्यासारख्या सुसंस्कृत नगरीला नक्कीच भूषणावह नाही, याची आपण प्रकर्षाने नोंद घ्यावी, अशी उपहासात्मक टिपणी धर्मराज्य पक्षाचे सहसचिव नरेंद्र पंडित यांनी, आयुक्तांना पाठवलेल्या पत्रातून केली आहे. दरम्यान, दिल्लीतील वाढते जीवघेणे प्रदूषण पाहाता, ठाणे महानगरपालिका प्रशासनाने, कचरा गोळा करणाऱ्या आणि तो वाहून नेणाऱ्या वाहनांची स्वच्छता राखण्यासाठी ठोस उपाययोजना करावी. अन्यथा, भविष्यात नागरिकांच्या आरोग्याचा बोजा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही पंडित यांनी आपल्या पत्राद्वारे स्पष्ट केले आहे. ठाणेकर नागरिक हे ‘करदाते’ आहेत, ठाणेकरांच्या पैशातूनच शहरातील सोयी-सुविधा जनतेला पुरविल्या जातात. त्याचप्रमाणे, कचरा गोळा करणाऱ्या आणि तो वाहून नेणाऱ्या वाहनांची स्वच्छता राखणे हीदेखील एक महत्त्वाची सुविधा असून, अस्वच्छ व दुर्गंधीयुक्त वाहने शहरात फिरणे, त्यातून आरोग्याचा प्रश्न निर्माण होणे, हा ठाणेकर करदात्या नागरिकांच्या पैशांचा अपव्यय असल्याचे लक्षात घेऊन, यापुढे ठाणे शहरातील कचरा गोळा करणाऱ्या आणि तो वाहून नेणाऱ्या वाहनांची स्वच्छता राखणेकामी, महापालिका प्रशासनाला आपण योग्य त्या सूचना देऊन, स्वच्छतारक्षकांच्या आरोग्यासोबतच, सर्वसामान्य ठाणेकर नागरिकांच्याही आरोग्याची प्राधान्याने काळजी घ्यावी, अशी मागणी, ‘धर्मराज्य पक्षा’चे सहसचिव नरेंद्र पंडित यांनी, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरव राव यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे.
००००
