गतवर्षीच्या वापरापेक्षा ५३२ दशलक्ष घनफूट अधिक
हरिभाऊ लाखे
नाशिक : जलशुध्दीकरण केंद्रात स्वच्छतेसाठी वापरले जाणारे पाणी, वाहिन्यांमधील गळती, पाणी चोरी, अनधिकृत जोडण्या, पाणी मापनासाठी मीटर नसणे वा संथ चालणे आदी कारणांस्तव ४३ टक्के पाणी महसूल नसणारे आहे. त्यामुळे शहरातील पाणी पुरवठा सुरळीत राखण्यासाठी विहित मापदंडापेक्षा जादा पाण्याची आवश्यकता भासते. याकडे लक्ष वेधत शहरासाठी २०२४-२५ या वर्षात ६२०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित करण्याची मागणी महापालिकेने पाटबंधारे विभागाकडे केली आहे.
महापालिकेला गतवर्षी ऑक्टोबर २०२३ ते ३१ जुलै २०२४ या कालावधीत ५३१४ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षण जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूर केले होते. दुष्काळी स्थितीत अतिरिक्त ४०० दशलक्ष घनफूट पाणी उचलण्याची मुभा दिली गेली होती. या काळात महापालिकेने प्रत्यक्षात अधिक म्हणजे ५६६८ दशलक्ष घनफूट पाण्याचा वापर केला. आता आगामी वर्षात म्हणजे १५ ऑक्टोबर २०२४ ते ३१ जुलै २०२५ या २९० दिवसांसाठी गंगापूर, दारणा धरण (चेहेडी बंधारा) आणि मुकणे या धरणांमधून एकूण ६२०० दशलक्ष घनफूट पाण्याची मागणी करण्यात आली आहे. गतवर्षी वापरलेल्या पाण्यापेक्षा हे प्रमाण ५३२ दशलक्ष घनफुटने जास्त आहे.
शासन निकषानुसार शहरात प्रतिमाणसी प्रतिदिन १३५ लिटर पाणी वापर गृहीत धरला जातो. या सुत्रानुसार एकूण लोकसंख्येला लागणारे पाणी लक्षात घेऊन पाणी आरक्षित केले जाते. उपरोक्त निकषापेक्षा अधिक प्रमाणात प्रतिमाणसी पाणी वापर होत आहे. मागील दुष्काळी वर्षात राजकीय दबावामुळे मनपाने अखेरपर्यंत पाणी कपातीचे धारिष्ट्य दाखवले नव्हते. वाढीव पाणी आरक्षणाचा निर्णय पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील आकस्मित पाणी आरक्षण समितीकडून घेतले जातात. एरवी पावसाळा संपताच या अनुषंगाने बैठक पार पडली. त्यासाठी १५ ऑक्टोबर रोजीच्या धरणांतील जलसाठ्यांचा आधार घेतला जातो. आचारसंहिता व नवीन सरकार स्थापन होत असल्याने ही प्रक्रिया थांबलेली आहे. पालकमंत्री नियुक्तीनंतर या विषयावर अंतिम निर्णय होईल, असे सांगितले जाते.
२६ लाख लोकसंख्या गृहित
पिण्याच्या पाण्याकरिता २०२४-२५ वर्षासाठी मागणी नोंदविताना महापालिकेने २३ लाख निवासी आणि तीन लाख तरती अशी एकूण २६ लाख लोकसंख्या गृहीत धरली आहे. बिगर निवासी वापरात शासकीय कार्यालये, शाळा व महाविद्यालये, रेल्वे स्थानक, शैक्षणिक संस्था, वसतिगृहे, शासकीय व खासगी रुग्णालये, तरण तलाव, अग्निशमन दल यांची गरजही समाविष्ट आहे. शहरात दोन लाख पशूधन असल्याचा अंदाज आहे.
कोणत्या धरणातून, किती मागणी ?
गंगापूर धरण समूह – ४५०० दशलक्ष घनफूट
दारणा धरण (चेहेडी बंधारा) – २०० दशलक्ष घनफूट
मुकणे धरण – १५०० दशलक्ष घनफूट