कल्याण – येथील आधारवाडी तुरुंगातील एका न्यायबंदीला इतर सात न्यायबंदींनी मंगळवारी सकाळी दगड आणि बादलीच्या साहाय्याने मारहाण केली. या मारहाणीत एका न्यायबंदीच्या डोळे, डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी एका न्यायबंदीच्या तक्रारीवरून महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.
पोलिसांच्या प्राथमिक तपासणी अहवालातील माहिती, अशी की हरयाणा येथील रेल्वे सुरक्षा बळात नोकरीला असलेला एक जवान आधारवाडी तुरुंगात न्यायबंदी म्हणून दाखल आहे. संबंधित न्यायबंदी जवान तुरुंगातील सार्वजनिक नळावर मंगळवारी सकाळी उभा होता. त्यांच्या बाजुला अन्य एक न्यायबंदी उभा होता. हा न्यायबंदी तुरुंगातील अंतर्गत सेवेत रखवालदाराचे काम करतो. जवान, रखवालदार न्यायबंदी उभे असताना अचानक रखवालदार असलेल्या न्यायबंदीच्या दिशेने तुरुंगातील इतर सात न्यायबंदी धाऊन आले. त्यांनी त्या न्यायबंदीला मारहाण करण्यापूर्वीच जवान असलेल्या न्यायबंद्याने मध्यस्थी करून सातही जणांना तेथून परतून लावले. या सगळ्या गोष्टीचा राग सात न्यायबंदींना आला.
या घटनेनंतर न्यायबंदी जवान स्वच्छतागृहात गेले. त्यांच्या पाठोपाठ सातही न्यायबंदी गेले. स्वच्छतागृहातून जवान न्यायबंदी बाहेर आल्यावर सातही न्यायबंदींनी त्यांना दगड आणि बादलीने मारहाण केली. या मारहाणीत रेल्वे सुरक्षा बळात जवान असलेल्या पण आधारवाडी तुरुंगात न्यायबंदी असलेल्या जवानाच्या डोळे, डोक्याला दुखापती झाल्या.या मारहाण प्रकरणी आधारवाडी कारागृह येथील अधिकाऱ्यांचे पत्र महात्मा फुले पोलीस ठाण्याला प्राप्त झाले. पोलिसांनी मारहाण झालेल्या न्यायबंदीचा जबाब घेऊन सात न्यायबंदींवर गु्न्हा दाखल केला.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *