माथेरान : दिवसेंदिवस सर्वच ठिकाणी राजकारणाने वेगळी दिशा घेतली असून राजकारणाची परिभाषाच पूर्णपणे बदलून निव्वळ आर्थिक  लोभापोटी दुसऱ्या पक्षाची तळी उचलण्याची कामगिरी नेत्यांसह कार्यकर्ते सुध्दा मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने करत असल्यामुळे एक प्रकारे नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत काही पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आपली नीतिमूल्ये आणि नैतिकतेचा कडेलोट केलेला माथेरान करांना अनुभवायला मिळाला आहे. सद्यस्थितीत इथे गल्लीबोळात नेते तयार होऊ लागले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका लक्षात घेता आतापासूनच खिशात दमडी नसताना सुद्धा अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून पक्षाच्या आर्थिक बळावर निवडणुकीसाठी सज्ज झालेले दिसत आहेत.
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत कधी नव्हे एवढा स्वप्नवत घोडेबाजार पहावयास मिळाला. काही पक्षांच्या नेते मंडळीनी आणि कार्यकर्त्यांनी तर कहरच केला होता स्वतःच्या पक्षाचा अधिकृत उमेदवार असताना देखील दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराला सर्वतोपरी मदत करण्यासाठी जीवाचे रान करत होते. त्यासाठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी निवडणूक फंडाचा माथेरान बाहेर राहणाऱ्या मतदारांना वाटप करून मताधिक्य वाढविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले गेले. तर काही पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मतदारांना निवडणूक फंड वाटप करून ते मतदार आपल्या उमेदवाराला मतदान करतात की नाही याबाबत गांभीर्याने घेतले नाही. माथेरान मध्ये बाराही महिने राजकीय श्रेयवादाची लढाई सुरूच असते. संपूर्ण माथेरान मध्ये जेमतेम 4000 मतदार असून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महत्त्वाच्या पक्षांच्या उमेदवाराला बाराशे ते पंधराशे मते वाटणीस येतात. या निवडणुका जरी इथे खेळीमेळीच्या वातावरणात पार पडत असल्या तरीसुद्धा येथील राजकीय नेत्यांनी आपले लक्ष नगरपालिका निवडणुकीवर केंद्रित केलेले असते. पुढील मार्च ते एप्रिल या महिन्यात नगरपालिका निवडणुका होण्याची शक्यता आहे त्यामुळे निवडणुकीसाठी फंड देणारा आर्थिक दृष्ट्या सक्षम नेता असावा यासाठी या विधानसभा निवडणुकीत इथल्या काही राजकारण्यांनी शर्तीचे प्रयत्न करून आपल्याला नगरपालिका निवडणुकीत आर्थिक मदत करणाऱ्या उमेदवाराला मते मिळवुन देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली होती. एकंदरीतच विधानसभा निवडणुकीतील घोडेबाजार पाहता आगामी नगरपरिषदेच्या निवडणुकीत चांगल्या प्रकारे आर्थिक रसद मिळेल यासाठी बहुतांश मतदारांच्या आशा सुद्धा पल्लवीत झालेल्या दिसत आहेत.त्यामुळेच सर्वसामान्य उमेदवाराला नगर परिषदेच्या निवडणुकीत आर्थिक दृष्ट्या तग धरणे कठीण होऊन बसले आहे.
माथेरानचा मतदार  सुद्धा आता सुज्ञ झालेला आहे. मागील काळात पक्षांतर करून मोठ्या प्रमाणावर आर्थिक लाभ घेतलेल्या नगरसेवकांची करामत सर्वांनाच ठाऊक असल्यामुळे जर आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी मोठ्या प्रमाणात रक्कम घेऊन पक्षांतर करतात तर आपण सुद्धा निवडणूक फंडातील काही रक्कम घेतल्यास त्यात वावगे काय? असाही सवाल मतदार करताना दिसत आहेत. परंतु यामध्ये निष्ठेने काम करणारा उमेदवार कशाप्रकारे आगामी नगरपरिषद निवडणुकीला सामोरे जाईल हे पाहणे तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *