ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात फेरिवाला धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाने पाऊले उचलली असून त्याचाच एक भाग म्हणून फेरिवाला क्षेत्र निश्चितीसाठी प्रशासनाकडून पुन्हा एकदा रस्त्यांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. तसेच फेरिवाला समिती सदस्य निवडीसाठी निवडणुक घेण्याची तयारी प्रशासनाने सुरू केल्याने गेले अनेक वर्षे रखडलेली ही निवडणुक लवकरच होण्याची चिन्हे आहेत.
ठाणे महापालिका क्षेत्रात फेरिवाला धोरणाची अद्याप अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. गेले अनेक वर्षे हे धोरण कागदावरच असल्याचे चित्र आहे. या धोरणासाठी पालिकेने २० जणांची समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, ही समितीही अद्याप गठीत होऊ शकलेली नाही. या २० जणांच्या समितीमध्ये पालिका आयुक्त, पोलिस आयुक्त, वाहतूक पोलिस उपायुक्त, नगर नियोजन अधिकारी, आरोग्य अधिकारी असे पाच पदसिद्ध सदस्य आहेत. आठ फेरिवाल्यांचे प्रतिनिधी, दोन सामाजिक संस्था, २ गृहनिर्माण संस्था, पणन विभाग, बँक आणि व्यापारी संघटनेचा प्रत्येकी एक पदाधिकारी या समितीत नियुक्त होऊ शकलेले नाहीत. त्यामुळे या सर्वांची नियुक्ती करण्यासाठी पालिकेने हालचाली सुरू केल्या आहेत. यातील फेरिवाला प्रतिनिधी वगळता, इतर सदस्य अर्ज मागवून नियुक्त केले जाणार आहेत. तर, फेरिवाला प्रतिनिधी निवडीसाठी निवडणुक घेतली जाणार आहे. पालिकेकडे आतापर्यंत १ हजार ३६६ फेरिवाल्यांनी नोंदणी केली असून हे सर्वजण मतदार असणार आहेत. या निवडणुकीनंतर पुन्हा फेरिवाल्यांचेही सर्वेक्षण केले जाणार आहे.
ठाणे महापालिका प्रशासनाने यापुर्वी फेरिवाला धोरणाच्या अंमलबजावणीसाठी रस्त्यांचे सर्वेक्षण केले होते. फेरिवाल्यांमुळे वाहतूकीस अडथळा निर्माण होणार नाही, याचा अभ्यास करून काही रस्ते फेरिवाला क्षेत्र करण्याचा प्रस्ताव तयार केला होता. परंतु हा प्रस्ताव धुळखात पडल्याचे चित्र आहे. परंतु आता हा प्रस्ताव आणि सद्यस्थिती याचे पुन्हा सर्वेक्षण करण्यात येणार असून त्याआधारे फेरिवाला क्षेत्र निश्चित करण्याचा विचार प्रशासकीय पातळीवर सुरू आहे. गर्दीचे, वदर्ळीच्या असलेल्या रस्त्यांवर फेरीवाल्यांमुळे पादचाऱ्यांना चालणे शक्य होत नाही. त्यामुळे पदपथ सोडून रस्त्याचा एक मीटर बाहेर एक पांढरी रेषा आखली जाणार आहे. त्या पांढऱ्या रेषेच्या पलिकडे फेरीवाल्यांना जाता येणार नाही. किंबहुना त्या रेषेच्या आतमध्येच फेरीवाल्यांना बसण्याची मुभा दिली जाणार आहे. जेणेकरुन पदपथ मोकळे होऊन पादचाऱ्यांना चालणे सुलभ होणार आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली.
कोट
ठाणे महापालिका क्षेत्रात फेरिवाला धोरणाची अंमलबजावणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लवकरच फेरिवाला समिती सदस्य निवडीसाठी निवडणुक घेण्यात येईल आणि त्याचबरोबर फेरिवाला क्षेत्र निश्चितीसाठी सर्वेक्षण करण्यात येणार आहे. प्रशांत रोडे अतिरिक्त आयुक्त, ठाणे महापालिका
००००