मुंबई : भारतीय संविधानाचे जनक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून त्यांचे लाखो अनुयायी चैत्यभूमी (दादर, मुंबई) येथे येतात. त्यांची नीट व्यवस्था पाहिली जावी, त्यांची कुठेही कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले बुधवारी दिले होते. त्यानंतर पालिका कर्मचाऱ्यांनी देखील चोख व्यवस्था केली आहे. त्याचबरोबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी मुंबईत स्थानिक सुट्टी जाहीर करण्याचे निर्देशही शिंदे यांनी यावेळी दिले. दरम्यान, बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी गुरुवारी रात्रीपासूनच त्यांचे अनुयायी चैत्यभूमीवर दाखल होत आहेत.
६ डिसेंबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मुंबईतील दादरमधील चैत्यभूमीत त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निधनानंतर ६ डिसेंबर हा दिवस महापरिनिर्वाण दिवस म्हणून पाळला जाऊ लागला. यानिमित्ताने दरवर्षी लाखोंच्या संख्येने त्यांचे अनुयायी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी दादरच्या चैत्यभूमीवर दाखल होतात. काल, संध्याकाळपासूनच अनुयायी चैत्यभूमीवर दाखल होऊ लागले आहेत.
चैत्यभूमीवर हेलिकॉप्टरच्या मदतीने पुष्पवृष्टी
बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांची संख्या दरवर्षी वाढत आहे. त्यांना भोजन, स्वच्छ व पुरेशी स्वच्छतागृहे, वैद्यकीय सुविधा, राहण्याची सुविधा, वाहतूक व्यवस्था, मदत आणि समन्वय कक्ष, सुरक्षा व्यवस्था अशा सोयी सुविधा प्रशासनाकडून पुरवल्या जातात. त्यात कुठलीही कसर न रागण्याचे आदेश मुख्यमंत्री कार्यालयाने दिले आहेत. या सुविधा पुरवताना कोणत्याही अनुयायाची गैरसोय होणार नाही, याची सर्व संबंधित यंत्रणांनी दक्षता घ्यावी. सूचनांची दखल घेऊन सर्व कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत. हेलिकॉप्टरच्या माध्यमातून चैत्यभूमीवर पुष्पवृष्टी करण्याचे नियोजन करण्यात यावे. परिसरात पूर्ण स्वच्छता राखण्यात यावी. विविध रेल्वे स्थानकांवर मदत कक्ष उभारण्यात यावेत, असे आदेश काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी संबंधित यंत्रणांना दिले होते.
मुंबईतील दादर येथे ६ डिसेंबर रोजी होणाऱ्या महापरिनिर्वाण दिनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी दोन दिवसांपूर्वी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. महापरिनिर्वाण दिनाची तयारी प्रशासनाच्या वतीने करण्यात आली असून त्यात कोणतीही कमतरता जाणवू नये, असे निर्देश या बैठकीत दिले. महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्त येणाऱ्या अनुयायांना राहण्यासाठी तंबू, आरोग्य सुविधा, पुरेशी शौचालये, जेवण्याची तसेच पिण्याच्या पाण्याची सोय, जागोजागी मदत कक्ष स्थापन करावे. येणाऱ्या गर्दीचे योग्य नियोजन करावे, असे निर्देश याप्रसंगी दिले. या बैठकीला देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, नागसेन कांबळे उपस्थित होते. दरम्यान, राज्याचे नवनिर्मवाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार या तिघांनी आज सकाळी चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेबांना अभिवादन केलं.
0000