संतांच्या प्रबोधन परंपरेने विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, मानवतावाद, शोधक बुद्धी व सुधारणावाद यांचा विकास करण्याचा प्रयत्न केला. भारतीय संविधानाच्या अनुछेद 51क- ज – मध्ये नेमके हेच मूलभूत कर्तव्य नमूद करण्यात आले आहे. आगोदरच्या भक्ती परंपरेत यज्ञयागादी किचकट साधन सांगितली होती, पारलौकीक सुखाची लालूच दाखविलेली होती, किचकट कर्मकांडात समाज गुर्फटून गेला होता. एकंदर भक्तीच्या वाटा दुस्तर करून ठेवल्या होत्या. या अवघड वाटा संतांनी मोडून काढून भक्ती पंथ बहू सोपा केला.
मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर l
केला राज्यभार चाले ऐसा ll
भक्तीच्या वाटा अगोदर खूप किचकट कर्मकांडातून जात होत्या. यज्ञ, तप, व्रतवैकल्ये आदी कर्मकांडात समाज पूर्णपणे गुर्फटलेला होता. म्हणजे पाऊस पडायचा असेल तर यज्ञ केला पाहिजे, असे सागितले जात होते. मात्र वारकरी संतांनी यज्ञयागांनी सिद्धी प्राप्त होत नाही, असे स्पष्ट सांगितले. आणि मलासुद्धा स्वतःला साक्षात्कार झाला की, यज्ञ करून पाऊस पडत नाही, उलट पाऊस न पडण्यासाठी जी अनेक कारणे आहेत. त्यात यज्ञ एक आहे.
साक्षात्कार म्हटल्यानंतर वाचणारांच्या भुवया उंचावल्या असतील. विशेषतः जे मला ओळखतात ते तर म्हणतील ही शुद्ध थाप आहे. समोर भेटले तर मला विचारतीलही. महाराज आम्ही काय तुम्हाला ओळखत नाही का? तुम्ही पत्रकार म्हणून काम करता, व्याख्यान देत, कीर्तन-प्रवचन करीत गावोगांव फिरता. मग तुम्हाला साक्षात्कार कसा होईल. आमच्या आतापर्यंतच्या ऐकण्यात असे आले आहे की, साक्षात्कार होण्यासाठी कोणत्या तरी गुहेत जाऊन बसावे लागते. साधना करावी लागते. मग तुमच्या इतक्या दगदगीच्या, धावपळीच्या जीवनात तुम्हाला साक्षात्कार होईलच कसा? असा प्रश्न पडेल. पण आपल्याला एक सांगतो इतरांना साक्षात्कार होण्यासाठी गुहेत, बसावे लागत असेल. जंगलात जावे लागत असेल पण माझी गेल्या काही वर्षांपासून तिर्थक्षेत्रे बदलली आहेत. फूटपाथ वरच्या मुलांना शिकवणारी बटू सावंत यांची पूलाखालची शाळा, गावात येण्यास आजही ज्यांना मज्जाव आहे, आले तर त्यांच्याकडे चोर म्हणूनच पाहिले जाते, ज्यांच्या हजारो पिढ्या डोंगर-द-यातील पालात जन्मल्या आणि तिथेच संपल्या त्या पालामध्ये शाळा भरवून पारधी समाजातील मुलांना शिक्षणाची गोडी लावणारी जामखेडच्या सत्तार शेखची पालातली शाळा, समाजातून अत्यंत हीन वागणूक दिल्या जाणा-या तृतीयपंथीयांना हक्काचा असरा देऊन, त्यांना शिक्षण आणि आत्मसन्मान मिळवून देणारा दिशा शेख यांचा श्रीरापूर येदील प्रकल्प, गिरीश कुलकर्णी यांनी वेश्यांच्या मुलांसाठी नगर येदे सुरू केलेली शाळा या माझ्यासाठी तिर्थयात्रा आहेत. तर शेतमालाचे पडलेले भाव, खत, बियाणे, मजुरी यांचे वाढलेले भाव. निसर्गाचा लहरीपणा यामुळे खचलेल्या शेतक-यांना धीर देऊन आत्महत्येपासून परावृत्त करणे ही माझ्यासाठी साधना आहे. 2015-16 च्या दुष्काळात मराठवाडा होरपळून निघाला होता. लातूर जिल्ह्याला तर रेल्वेतून पाणी-पुरवठा करावा लागला. अनेक नेत्यांनी या दुष्काळी भागाचे दौरे केले. त्यातील एका नेत्याच्या दौ-यात मीही सहभागी झालो होतो. आम्ही नदीवर गेलो, विहिरी पाहिल्या, बारवा पाहिल्या तळे पाहिले. पाणी विहिरीत नव्हतं, पाणी बारवात नव्हतं, पाणी तळ्यात नव्हतं. पाणी एकाच ठिकाणी होतं. ते म्हणजे शेतक-यांच्या डोळ्यात पाणी होतं. त्यावेळी तिथली परिस्थिती पाहून माझ्या मोबाईलवर सहज शब्द टाईप होऊन गेले –
उजाड राने उदास चेहरे
डोक्यात दाटले पाणी l
श्रावणात मग कशी सूचावी
सांगा पाऊस गाणी l
सर्व तालुक्यांची पाहणी झाल्यानंतर आम्ही दुष्काळ निवारणाच्या काय व्यवस्था केल्या आहेत हे जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात गेलो. त्यांनीही मग चा-याची काय व्यवस्था केली आहे, पाण्याचा साठा किती आहे वगैरे माहिती दिली. बाहेर पडताना मग जिल्हाधिकारी यांना मी प्रश्न विचारला की, कोकणात चांगला पाऊस पडतो, गडचिरोलीला चांगला पाऊस पडतो. मग बीड, लातूर, उस्मानाबाद, जालना या मराठवाड्यातील जिल्ह्यात पाऊस का पडत नाही? त्यावर जिल्हाधिकारी यांनी दिलेले जे उत्तर आहे ते खूप महत्वाचे आहे. ते म्हणाले, पावसाचे समतोल प्रमाण रहायचे असेल तर वनक्षेत्र किमान तेहत्तीस टक्के पाहिजे. गडचिरोली, कोकण भागातील वनक्षेत्र 60 टक्यापेक्षा जास्त आहे. म्हणून तिकडे पाऊस जास्त पडतो. मग त्यांना विचारले लातूरचे वनक्षेत्र किती आहे. त्यांनी जे उत्तर दिले ते ऐकूण मला प्रश्न पडला आता जो पाऊस पडतो तो तरी कसा पडतो? कारण लातूरचे वनक्षेत्र आहे 0.7, उस्मानाबादचे वनक्षेत्र आहे 0.57 आणि बीड जिल्ह्याचे वनक्षेत्र आहे 1.27 म्हणजे आपण एक-दोन टक्के सुद्धा वनक्षेत्र ठेवणार नसू तर कोणत्या तोंडाने आपण देवाकडे, निसर्गाकडे पाऊस मागणार आहोत.
म्हणजे पाऊस पडायचा असेल तर वनक्षेत्राची गरज असते आणि यज्ञात तर लाकडं तोडून जाळावी लागतात. लाकडं तोडण्यासाठी वनाची नासाडी करावी लागते. म्हणूनच मी म्हणालो की, पाऊस यज्ञ करून पडत नाही, तर पाऊस न पडण्यासाठी यज्ञ हे एक कारण आहे. म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज यांनी विज्ञाननिष्ठ आणि पर्यावरणपूरक उपाय सांगितला महावने लावावी नानाविध. महावने लावण्याचा सल्ला देत असतानाच योग आणि याग करून कुणालाही सिद्धी प्राप्त होत नाही, हे त्यानी हरिपाठात स्पष्टपणे सांगितले आहे.
योग याग विधी येणे नोहे सिद्धी l
वायाचि उपाधी दंभ धर्म ll
योग आणि यागामुळे कुठलीही सिद्धी प्राप्त होत नाही, उलट अहंकार होतो, असा इशारा ज्ञानेश्वर महाराज देतात. खरं तर वारकरी संप्रदायापूर्वी यज्ञ संस्कृतीचे मोठे स्तोम होते. त्यातून वृक्षतोड होऊन पर्यावरणाचा नाश, बळी देऊन पशू हत्या, तुपाची धार लावून आर्थिक हानी अशा अनेक त-हेने खर्चिक असणा-या यज्ञ संस्कृतीला नाकारून नाम साधनेचा सोपा पर्याय संतांनी दिला. एकही झाड न तोडता, एकही थेंब तूप न जाळता, एकही पशू बळी न देता फक्त भगवंताचे नाम घेऊन पाऊल टाकलं तर ते यज्ञ केल्या सारखे आहे, असे संत सांगतात.
राम म्हणता वाटचाली l
यज्ञ पाऊला पाऊली ll
तप, तिर्थ, यज्ञ-याग यातून समाजाला मुक्ती देण्यासाठी सोपे पर्याय दिले. एकनाथ महाराज एका अभंगात म्हणतात-
नलगे तिर्थाचे भ्रमण l
नलगे दंडण -मुंडण l
नलगे पंचाग्नी साधन l
तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा ll
कर्मकांडात अडकलेल्या समाजाला मुक्त करणारा संविधानाने सांगितलेला सुधारणावाद संतांनी समाजात रुजविला.
वैकुंठ आणि स्वर्ग या पारलौकीक सुखाची लालूच आणि नरकयातना आणि जन्ममृत्यूचा धाक दाखवून समाजाचे मोठ्या प्रमाणात सोशन केले जात होते. वारकरी संतांनी स्वर्ग आणि वैकुंठ या पारलौकीक सुखालाच तुछ ठरवून टाकले. एकाही वारकरी संतांनी स्वर्ग अथवा वैकुंठाला जाण्याची आपेक्षा केली नाही. नामदेव महाराज यांनी तर स्पष्ट शब्दांत वैकुंठ नाकारला. नव्हे त्याला तुछ ठरविले. नामदेव महाराज म्हणतात-
वैकुंठाशी आम्हा नको धाडू हरी l
वास दे पंढरी सर्वकाळ ll
नामदेव महाराज यांना विचारले की संत परंपरेपूर्वी तर अध्यात्मिक वाटचाल करणाराला प्रत्येकजण स्वर्ग आणि वैकुंठालाच जाण्याची इच्छा करीत होता. आता तुम्ही मात्र तिकडे पाठवू नका असं म्हणता! असं का?
मग नामदेव महाराज सांगतात त्यांना स्वर्गात काय आहे ते माहिती नसेल….. तिथल्या कल्पिलेल्या गोष्टींचा त्यांना मोह होत असेल. बरं त्याना स्वर्ग माहिती नाही म्हणता मग तुम्हाला तरी स्वर्गाबद्दल माहिती आहे का? असे विचारले असता नामदेव महाराज स्पष्ट शब्दांत सांगतात-
वैकुंठ खोपट जुनाट झोपडी l
तेथे आडाआडी घालू नको ll
वैकुंठ ही जुनाट झोपडी असल्याने त्याच्या विषयी आम्हाला कोणतेही आकर्षण नाही, असे सांगून ज्या वैकुंठाची लालूच दाखवून भोळ्याभाबड्या लोकांचे शोषण केले जात होते, त्या वैकुंठाला तुच्छ लेखून त्याचे आकर्षण संपवून टाकले.
वैकुंठा प्रमाणेच दुसरे स्वर्गाचे आकर्षण दाखविले जाते. इथे जीवंतपणी सर्व सुखाचा त्याग केला तर स्वर्गात उच्च भोगभोगायला मिळतात असे वर्णन केले जाते. त्याला तुकाराम महाराज मोठा धक्का देतात. तुकाराम महाराज सांगतात स्वर्गात जे अमर होऊन राहिले आहेत ते तिथे कंटाळले असून मृत्यूलोकांत येण्याची इच्छा आता व्यक्त करू लागले आहेत.
स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा l
मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा ll
म्हणजे पारलौकीक सुखाचा जो डोलारा निर्माण केला होता, त्याला सहज धक्का देऊन त्याचे आकर्षण कमी करून सुधारणावादाची रुजवात संतानी केल्याचे आपल्याला पहायला मिळते.
मी अशी कीर्तनातून मांडणी करू लागतो तेव्हा काही लोक मला म्हणतात, महाराज तुम्ही हिंदू असून आपल्याच स्वर्ग-वैकुंठाबद्दल तुछतेची भावना समाजात निर्माण करता. असा एक तरी इतर धर्मातला माणूस आहे का? जो आपल्या धर्मातील पारलौकीक सुखाबद्दल तुछ भावना निर्माण करतो. तेव्हा मी असे विचारणाराला सांगत असतो की, एक तर वैकुंठ आणि स्वर्गाला मी नव्हे तर संतांनी तुछ लेखलेले आहे आणि इतर धर्मातील पारलौकीक सुखाला त्या धर्मातील लोक कमी लेखतात असं एक तरी उदाहरण आहे का? या प्रश्नाचे उत्तर असे आहे की, कोणत्याही धर्मातील विचावंत आपल्या धर्माची चिकित्सा करतात.
एक खरे आहे की, जवळपास सर्वच धर्मात पारलौकीक सुखाच्या संकल्पना रंगविल्या आहेत आणि त्या पारलौकीक सुखाची लालूच दाखवून दिशाभूल केली जाते. आज मुसलमान धर्मात जे धर्मांध तरुण आत्मघातकी अतिरेकी कारवायामध्ये सहभागी व्हायला तयार होतात त्यांच्याही मनावर बिंबविलेले असते की, इथे जर तुम्ही धर्मासाठी मेलात तर तुम्हाला जन्नतमध्ये जागा मिळेल. काय असंत जन्नत आणि स्वर्गामध्ये? जन्नतमध्ये असतात. “हूर” म्हणजे अत्यंत देखण्या तरुणी. आणि स्वर्गात काय असत? अपसरा! म्हणजे दोन्हीकडे सुंदर स्रीयांच्या सोबतीची अभिलाषा. इथे जीव द्यायचा आणि परलोकात भोग भोगायचे. पण सर्वच धर्मातील चिकित्सक लोक अशा पारलौकीक सुखाचा फोलपणा उघडा करतात. आमचे नामदेव महाराज जसे वैकुंठाला झोपडी म्हणतात, तसेच इस्लाममधील जन्नत बद्दल मुस्लीम धर्मातील प्रसिद्ध शायर गालिब म्हणतात-
हमे मालूम है जन्नत
की हकीकत क्या है l
दिल बहलानेके दिये
गालिब ते खयाल अच्छा है l
तर अशा प्रकारे पारलौकीक सुखाची अशा संपवून संविधानाने सांगितलेली शोधकबुद्धी व सुधारणावादी विचारांना भक्कम केले.
भविष्य सांगणारे, ज्योतिष पाहणारे यांच्या बद्दल संतांनी लोकांना सावध केले आहे. भुत-भविष्याचा शकून सांगणारांचा आपल्याला कंटाळा असून त्याचे तोंड पाहणेही आपल्याला आवडत नाही हे सागताना तुकाराम महाराज म्हणतात-
सांगो जाणती शकून l
भूत भविष्य वर्तमानll1ll
त्यांचा आम्हीशी कंटाळा l
पाहो नावडती डोळा ll2ll
सिद्धी -सिद्धीचे साधक l
वाचा सिद्धी होती एक ll3ll
तुका म्हणे जाती l
पुण्यक्षय अधोगती ll4ll
रिद्धी -सिद्धीचे साधक किंवा आपल्याला वाचा सिद्धी प्राप्त आहे. आपण बोलू ते होते अशा थापा माणारे लोक हे पापी आहेत. या पापामुळे ते अधोगतीला जातात. तेच अधोगतीला जात असल्याचे सांगून तुकाराम महाराज अशा लोकांपासून सावध राहण्याचा इशारा देतात.
देवांना बळी देणे, नवस करणे या थोतांडाचाही तुकाराम महाराज समार घेताना म्हणतात-
सेंदरी हेंदरी दैवते l
कोण ती पूजी भुते-खेते l
आपुल्या पोटाशी रडते l
मागते शीते अवधान ll
सेंदराने माखलेले हेंदरी देव जर तुमच्याकडे काही मागत असतील, तेच स्वतः उपाशी असतील तर ते तुम्हाला काय सूख देणार आहेत? त्यामुळे अशा देवापासून दूर राहण्याचा सल्ला तुकाराम महाराज देतात. इतकेच नव्हे तर नवसं करूनही कुणालाही मूल होत नाही. त्यासाठी विवाहच करावा लागतो, असे सांगून संविधानाने सागितलेला विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन बळकट करताना तुकाराम महाराज म्हणतात-
नवसे कन्या – पूत्र होती l
तरी का करणे लागे पती ll
देवाला बळी देण्याच्या प्रथेलाही संतांनी विरोध केला आहे. नामदेव महाराज आपल्या एका हिंदी रचनेत म्हणतात.
पाहन अंगे देव काटिला l
बाको प्राण नही वाकी पूजा रचैला l
निरजीव आगे सरजीव मारे l
देखत जाणत आपण हारे l
ज्याच्या मध्ये प्राण नाही अशा मूर्तीची पूजा करतात आणि त्याच्या समोर सजीवाचा प्राण देतात. हे सर्व दिसत असूनही लोक असे वागतात, असे नामदेव महाराज म्हणतात. तर तिर्थाच्या बद्दल तुकाराम महाराज आणि संत कबीर यांनी मांडलेला विचार केवळ विज्ञाननिष्ठच नाही तर धाडसीही म्हणावा लागेल. तुकाराम महाराज
तिर्थी धोंडा-पाणी l
देव रोकडा सज्जनी ll
तर कबीर म्हणतात –
जतरा में फतरा बिठाया l
तिरथ बनगया पाणी l
दुनिया भई दिवानी l
पैसे की धुलधानी ll
संतांची चळवळ ही उत्तरेतील असो की दक्षिणेतील असो त्या सर्वांचा वैचारिक धागा हा सामाजिक सुधारणाच होता. म्हणूनच त्यांची भाषा वेगळी असली तरी विचार मात्र एक होते. संविधानाने सांगितलेला
मानवतावादी विचार तर संतांच्या शब्दांशब्दातून पाझरताना दिसतो. विस्तार भयास्तव तुकाराम महाराज यांच्या अभंगातील एक दाखला देतो.
ज्याशी अपंगिता नाही l
त्याशी धरी जो ह्रदयी l
ज्यांचे जगात कुणीच नाही त्यांना ह्रदयाशी धरणे हेच खरे साधुत्व आहे. तुकाराम महाराज यांनी सतराव्या शतकात मांडलेला विचारच साने गुरुजी यांच्या शब्दांतून 20 व्या शतकात प्रकट होतो.
जगी जे दीन अतपदीत l
जगी जे दीन पददलित l
तया जावोनी उठवावे l
जगाला प्रेम अर्पावे.
अशा त-हेणे संविधानातील जी मूलभूत कर्तव्य आपल्याला सांगितलेली आहेत. त्या कर्तव्याची जाण संतानीही जागोजागी करून दिल्याचे आपल्याला दिसते.
जो विचार ज्ञानेश्वरीमध्ये आला, विविध संतांच्या अभंगात आला तोच विचार भारतीय संविधानात प्रतिबिंबत झाल्याचे दिसते. म्हणूनच आपण जितका आदर संत विचारांचा करतो तितकाच आदर आपण भारतीय संविधानाचा केला पाहिजे. त्यातूनच समताधिष्टित समाज आणि निकोप लोकशाही बळकट होईल. म्हणूनच या लेखनाला पूर्णविराम देण्यापूर्वी सर्वांना आवाहन करणार आहे की, आपली खरोखरच संतांच्या विचारांवर श्रदा असेल, संविधानावर विश्वास असेल तर एक संकल्प करा की, आजपासून मी कुणाचाही जातीवरून, धर्मावरून, वंशावरून, लिंगावरून भेदभाव करणार नाही. आपण एवढं केलतं तरच ख-या अर्थाने माझे मानवतावादी धर्म कीर्तन सिद्धी गेले असे म्हणता येईल.
-समाप्त
संपर्क: 9892673047
9594999409

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *