मुंबई : शनिवारपासून सुरु होणाऱ्या विधिमंडळाच्या तीन दिवसीय हंगामी अधिवेशनासाठी भाजपाचे ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर यांची विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी निवड करण्यात आली. राजभवन येथे हंगामी अध्यक्षांचा शपथविधी सोहळा संपन्न झाला. त्यामुळे, विधिमंडळाच्या विशेष अधिवेशन काळात त्यांच्या अध्यक्षतेखाली विधानसभेचं कामकाज होणार आहे.

राज्यपाल राधाकृष्णन यांनी कोळंबकर यांना पद व गोपनियतेची शपथ दिली. त्यानंतर, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पुष्पगुच्छ देऊ त्यांचे अभिनंदन केले.  तर, विधानपरिषद सभापती निलम गोऱ्हे यांनीही कोळंबकर यांचे अभिनंदन केले. दरम्यान यंदातरी माझ्या अनुभवाचा विचार करता श्रेष्ठी माझा मंत्रिपदासाठी विचार करतील अशी भावना कालिदास कोळंबकर यांनी यावेळी बोलून दाखविली.

दरम्यान, शनिवार ७ डिसेंबरपासून विधिमंडळाचं तीन दिवसीय विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं आहे. विधिमंडळ सचिवालयाकडून कर्मचाऱ्यांना याबाबत महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विधिमंडळ सचिवालयाकडून सर्व कर्मचाऱ्यांना तयारीसाठी उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या विशेष अधिवेशनात नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधीचा कार्यक्रम पार पडणार आहे. तर, ९ डिसेंबरला नव्या विधानसभा अध्यक्षाची निवड होणार आहे.  आमदारांच्या बहुमताने विधानसभा अध्यक्ष निवड होईल. त्यानंतर, १६ डिसेंबरपूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *