उद्धारली कोटी कुळे, भिमा तुझ्यामुळे…
जगातील सर्व रंजल्या गांजलेल्यांना शिका संघटीत व्हा आणि न्यायासाठी लढाचा महामंत्र देणाऱ्या महामानव बाबासाहेब आंबेंडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना अभिवादन करताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस… सोबत राज्यपाल राधाकृष्ण, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार
डॉ. संदीप वरकुटे
मुंबई : अवघ्या जगाला करुणेची, मानवतेची, शिक्षणाची शिकवण देणाऱ्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदरांजली वाहण्यासाठी चैत्यभुमीवर जनांचा महासागर लोटला होता.
आंबेडकरांचे जीवन चरित्र, बहुजन चळवळीचा इतिहास,भारताचे संविधान अशा विषयासंदर्भात असलेल्या पुस्तकांचे सुमारे पाचशेच्या वर स्टॉल लावण्यात आले होते. तसेच दिनदर्शिका, मेणबत्त्या, बिल्ले, गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मुर्त्या, रांगोळीचे साहित्य अशा बऱ्याच वस्तू विकणारी दुकाने होती. तसेच स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाकडून सलग 35 वर्षापासून चालू असणारे मोफत भोजनदान केंद्र अविरत सेवा देत होते. सोबतच मोफत नेत्रचिकित्सासारखे शिबिरही चालू होते. वेगवेगळ्या ग्रुप्स कडून पथनाट्य सादर केली जात होती. त्यामध्ये मात्र लक्ष वेधून घेणारी ईव्हीएम हटाव यासंबंधीची भारतीय युवा मोर्चाची मोहीम. या मोहिमेतील कार्यकर्त्यांशी चर्चा केली असता त्यांनी evm द्वारे निवडणूक प्रक्रिया घेतल्यानंतर मतांची चोरी कशी होते हे जनसामान्यांना कळावे व त्यासाठी आंदोलन उभे राहावे ही त्यांची भूमिका आहे.
चैत्यभूमी परिसराता सामाजिक प्रबोधनाचे असे अनेक उपक्रम विविध संस्थानी आयोजित केले होते.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल राधाकृष्ण ,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनीही चैत्यभुमीवर बाबासाहेबांना अभिवादन केलं.
जगात जर कोणते सर्वोत्तम संविधान असेल तर ते भारताचे आहे. कारण देशातील अडचणी कितीही असोत, त्या सर्वांचे उत्तर आपल्या राज्यघटनेत सापडते. बाबासाहेबांनी सर्व विषयांचा अभ्यास केला होता आणि हे घटनेत दिसून येते. बाबासाहेबांचे ऋण आपण कधीच फेडू शकत नाही. अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाबासाहेबांना श्रद्धांजली अर्पित केली.