पाणी व वीज पुरवठा देखील केला खंडित
उल्हासनगर : बड्या मालमत्ता कर थकबाकीदारांवर कारवाई करत महापालिकेने एक मोकळी जमीन सील करून तेथे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचा पहारा लावला आहे तेथील वीज कनेक्शन तोडण्याचे आदेश वीज विभागाला दिले असून पाणीपुरवठाही बंद करण्यात आला आहे. ज्यांच्या मालमत्ता कराची लाखोंच्या घरात थकबाकी आहे, त्यांच्यावर महापालिकेने कारवाई सुरू केली आहे आयुक्त विकास ढाकणे यांच्या सूचनेवरून मालमत्ता विभागाच्या कर निर्धरक निलम कदम व पथकाने ही कारवाई सुरू केली आहे.
उल्हासनगर – 3 येथील बी बी मोरे चौकात टेलिफोन एक्स्चेंजजवळ एक मालमत्ता असून, ज्याचा मालमत्ता कराचा भरणा अनेक दिवसांपासून झालेली नाही. मालमत्ता कराची थकबाकी 7 लाख 72 हजार रुपयांवर पोहोचली आहे. महापालिकेने कर भरण्यासाठी अनेक वेळा नोटिसा पाठवूनही त्याकडे दुर्लक्ष केल्याने शुक्रवारी कर विभागाच्या अधिकारी नीलम कदम यांनी आपल्या मालमत्ता कर विभागातील कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी वीज व पाणी पुरवठा खंडित केला. वीज खंडित करण्याबाबत महापालिकेने विद्युत विभागाशी पत्रव्यवहारही केला आहे.
महापालिकेच्या कर निर्धारक नीलम कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, या मिळकतीमध्ये 15 ते 20 झोपड्या बांधण्यात आल्या असून, महापालिकेचे कर्मचारी जेव्हाही कराची नोटीस घेऊन तेथे गेले, तेव्हा त्यांच्या मालकाचे नाव उघड करण्यात आले नाही. ही मालमत्ता जयराज कल्याणी आणि इतरांची आहे आणि २०१० च्या मोजमापानुसार या जमिनीची कागदावर ४० हजार चौरस फूट नोंद आहे, तर आता मोजणी केली असता ती जमीन ३ लाख चौरस फूट आहे. मालमत्ता कर अनेक पटींनी वाढला आहे महापालिका क्षेत्रात अनेक प्रभावशाली लोक आहेत जे मालमत्ता कर न भरून महापालिकेचे नुकसान करत असून शहराच्या विकासातही अडथळा ठरत आहेत.
नीलम कदम यांनी सांगितले की, कर चुकविणाऱ्यांवर त्वरीत कारवाई केली जाईल त्यामुळे सर्व थकबाकीदारांनी कर भरून महापालिकेला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
