माथेरान : पूर्वीपासूनच माथेरानमध्ये विकासाला गती देण्याऐवजी विरोध करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत असे हे एकमेव स्थळ असावे.किंबहुना तीन ते चार पिढयांनी इथे वास्तव्य केलेले असताना सुध्दा भावी पिढीला उदयोन्मुख विकासाकडे नेण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज असताना गावातील काही संकुचित बुद्धीच्या मंडळींनी आणि मुंबईत राहून माथेरान बाबत पोकळ सहानुभूती दाखविणाऱ्या धनाढ्य लोकांनी नेहमीच इथे होणाऱ्या विकास कामांना विरोध दर्शवून इथल्या सर्वसामान्य लोकांना आपापल्या व्यवसायात धन्यता मानन्यासाठी एकप्रकारे भाग पाडले आहे. मुंबईतील हे धनाढ्य लोक वर्षातून केव्हातरी येथे हजेरी लावतात त्यांना इथली परिस्थिती, इथल्या लोकांच्या जनजीवनाबाबत सुतराम कल्पना नसताना देखील माथेरान आहे तसेच ठेवावे असाच त्यांचा मानस आहे. इतर पर्यटन स्थळांवर आधुनिक युगाप्रमाणे नवनवीन बदल घडवून आणण्यासाठी तेथील स्थानिक लोक शासन दरबारी पुरेपूर प्रयत्न करत असतात.
आजमीतीपर्यंत या ठिकाणी येण्यासाठी नेरळ मार्गे माथेरान हाच एकमेव मार्ग आहे इथे पर्यायी व्यवस्था उपलब्ध व्हावी वाहतुकीची समस्या मार्गी लागावी यासाठी प्रयत्न केल्यास काही मुठभर लोक नेहमीच विकासाला खोडा घालण्यासाठी पुढाकार घेताना दिसतात. मागील काळात इथे पर्यायी व्यवस्था उपलब्ध व्हावी यासाठी माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर यांच्या प्रयत्नातून एमएमआरडीएच्या माध्यमातून फिनिक्युलर सारखा महत्वकांक्षी प्रकल्प मार्गी लागणार होता त्यावेळेस सुद्धा तालुक्यातील काही जबाबदार लोकप्रतिनिधींनी केवळ मतांसाठी या प्रकल्पाला विरोध दर्शविल्यामुळे ही पर्यायी व्यवस्था होऊ शकली नाही.१८५० मध्ये माथेरानचा शोध लागल्यानंतर ते
आजमीतीपर्यंत या ठिकाणी ब्रिटिश गुलामगिरीप्रमाणे हातरिक्षा ओढण्याचे काम पिढ्यानपिढ्या काही श्रमिक मंडळी करीत आहेत. त्यांना या अमानविय प्रथेतून कायमस्वरूपी मुक्ती मिळावी यासाठी हातरिक्षा संघटनेचे सचिव सुनील शिंदे यांनी 12 वर्षांपासून शासन दरबारी पाठपुरावा केल्यानंतर या ठिकाणी ई रिक्षा सुरू करण्यात आली आहे.त्यामुळे सद्यस्थितीत ई रिक्षाच्या सेवेमुळेच मागील वर्षापासून याठिकाणी पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होताना दिसते. आणि याच माध्यमातून सर्वांनाच चांगल्या प्रकारे रोजगाराच्या संधी उपलब्ध होताना दिसत आहेत. ई-रिक्षाला जरी ठराविक मंडळींचा विरोध असला तरी सुद्धा हीच मंडळी स्वतः आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य ई रिक्षाचा मोठया प्रमाणावर वापर करताना दिसत आहेत. रात्री अपरात्री दस्तुरी येथून गावात येण्यासाठी ई रिक्षाचाच सरासपणे वापर करतात.काही धूर्त राजकीय मंडळी ई रिक्षाला विरोध करणाऱ्यांना पाठीशी घालत असून स्वतः मात्र या सेवेचा सर्रासपणे लाभ घेत आहेत. त्यामुळे ज्यांना खरोखरच ई रिक्षाला विरोध करायचा आहे त्यांनी स्वाभिमान बाळगून या सेवेचा लाभ घेऊ नये असे ई रिक्षा समर्थकांचे म्हणणे आहे.
काेट
गेली सहा महिने झाले आम्ही माथेरान मधील पर्यटक आणी स्थानिक लोकांना सेवा देत आहोत त्याच बरोबर येथील तिनही शाळेतील विद्यार्थ्यांना आणी शिक्षक यांना उत्तमरित्या सेवा देत आहोत यामध्ये असे दिसून येत आहे की जे लोक ई रिक्षाला विरोध करत होते ते या सेवेचा सर्वात जास्त वापर करत आहेत आणी दुसरीकडे विरोधही करत आहेत त्यांना विनंती आहे की जर त्यांना या सेवेचा लाभ घ्यावा असे वाटत असेल तर त्यांनी जाहीर पाठींबा द्या दुटप्पी भूमिका घेऊन संघटनेला त्रास देऊ नये.
शैलेश भोसले — ई-रिक्षा चालक
काेट
जे रिक्षा विरोधक आहेत त्यांना जराही स्वाभिमान असेल तर त्यांनी एकतर रिक्षाला विरोध करावा नाहीतर ई-रिक्षाला पाठिंबा तरी द्यावा. उगाच येड्याच सोंग घेऊन दोन्ही दगडावर पाय ठेऊ नये. आणि जे रिक्षाला विरोध करतात त्याच माणसांना ईरिक्षा अगोदर हवी असतें. त्यामुळे त्यांनी एकतर खुला विरोध करावा नाहीतर पाठिंबा तरी द्यावा.
निखिल शिंदे — सामाजिक कार्यकर्ते माथेरान
काेट
माथेरान मध्ये इ रिक्षा आता सर्वांचेच गरज झाली आहे. या रिक्षांमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे ज्यामध्ये या रिक्षांना विरोध करणारे ही आहेत त्यामुळे रिक्षा चालकांनी रात्रीच्या प्रवासाकरता फोन करणाऱ्यांकडून ई रिक्षाला समर्थन द्या असे पत्र त्याच वेळी लिहून घ्यायला हवे व ई रिक्षा विरोधक यांच्याकडून अशा प्रकारची पत्रे जमा करावयास हवी त्यावेळी इतरांनाही समजेल की रिक्षाची कोणाला गरज आहे व विरोधक कोण आहेत.
रुपेश गायकवाड –ई रिक्षा चालक