मुंबई: धारावीत दाटीवाटीत, झोपडपट्टीत मोठ्या संख्येने लोक राहतात. अशावेळी त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे धारावीकरांची आरोग्य सुरक्षा लक्षात घेत धारावी सोशल मिशनच्या (डीएसएम) लोक विकास उपक्रमाद्वारे धारावीतील ३०० हून अधिक रहिवाशांची सरकारी कल्याणकारी योजनांअंतर्गत नोंदणी करत त्यांना वैद्यकीय विमा योजनेचा लाभ मिळवून दिला आहे. विम्याची एकूण रक्कम १० कोटी रुपये अशी आहे. तर इतर सरकारी योजनांसाठी १९७ जणांनी नोंदणी केली आहे.
धारावीतील बहुसंख्य लोक असंघटीत क्षेत्रात काम करतात. या क्षेत्रातील व्यक्तींसाठी सरकारच्या अनेक योजना आहेत. आयुष्यमान भारत, ई-श्रम कार्ड आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना यासारख्या कल्याणकारी योजना अंसघटीत क्षेत्रातील कामगारांना आर्थिक आणि आरोग्य सुरक्षा प्रदान करतात. मात्र जागरुकतेचा अभाव आणि इतर कारणांमुळे अनेक कामगार या योजनांच्या लाभापासून दूर राहतात. ही बाब लक्षात घेत डीएसएमने पुढाकार घेत धारावीतील रहिवाशांना, कामगारांना अशा योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी लोक विकास उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाअंतर्गत आतापर्यंत ३०० हून अधिक रहिवाशांची नोंदणी करत त्यांना वैद्यकीय विमा लागू केला आहे.
विम्यांची एकूण रक्कम १० कोटी रुपये अशी आहे. त्याचवेळी ई-श्रम कार्डसह अन्य योजनांसाठी लोक विकास उपक्रमाअंतर्गत १९७ जणांची नोंद करुन घेत त्यांना योजनांचा लाभ देण्यात आला आहे. वैद्यकीय विम्यासह इतर योजनांचा लाभ या उपक्रमाअंतर्गत मिळत असल्याने धारावीतील कुटुंबांसाठी हा दिलासा ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *