सिंधुदुर्ग :स्वर्गीय बाळासाहेबांनी ज्या दगडाला शेंदूर फासला,३० वर्षे सर्व पदे भोगली त्या सदा सरवणकर यांचा गर्व उतरवून मागचा हिशोब आपण चुकता केला अशा शब्दात माहीम मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार आणि मातोंड गावचे सुपुत्र महेश सावंत यांनी सरवणकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
मतदारसंघातील सर्व शिवसैनिक आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गद्दारीचा शाप पुसून टाकला असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
आमदार सावंत हे मातोंड (ता:वेंगुर्ला)या आपल्या गावी. ‘ घोडमुख ‘ देवाच्या जत्रेसाठी आले होते.सावंतवाडी येथे माजी आमदार राजन तेली,रुपेश राऊळ व अन्य पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. व त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.
त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले,सरवणकर यांना धडा शिकवायचा होता तो आपण शिकवला.आज सगळा हिशोब चुकता झाला.माहीम मतदारसंघात शिवसेनेचा भगवा फडकणार हे बाळासाहेबांना दिलेले वचन आज पूर्ण करता आले.राज ठाकरे यांचे आव्हान आमच्यासमोर नव्हतेच असेही ते म्हणाले.
मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीची तयारी आम्ही सुरू केली आहे.आमचे सर्वाधिक नगरसेवक निवडून येण्यासाठी आम्ही बांधणी सुरू केली आहे.तेव्हा यश मिळणारच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्यावर कोकणची जबाबदारी सोपवली तर ती आपण नक्की स्वीकारू,शिवाय इथल्या शिवसैनिकांना पूर्ण ताकद देण्याचे काम आपंकरू अशी ग्वाही त्यांनी दिली.
मातोंडच्या विकासासाठी हाक द्या..!
मातोंड ग्रामपंचायत आणि गावातर्फे ग्रामदेवता सातेरी मंदिरात सावंत यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
आपल्याला कधीही हाक द्या, मातोंडच्या विकासासाठी आपण सदैव तयार आहोत अशी ग्वाही त्यांनी यावेळी उपस्थित ग्रामस्थांना दिली. गावच्या देवदेवतांचे आशीर्वाद आणि ग्रामस्थांनी दिलेली साथ आणि प्रेम यामुळेच आपण ही लढाई जिंकू शकलो असेही ते म्हणाले. मुंबईच्या माजी महापौर श्रद्धा जाधव,उदय परब,सरपंच मयुरी पाटकर, उप सरपंच आनंद परब,अन्य सदस्य,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
