१९७१ पर्यंत बांगलादेश हा पाकिस्तानचा एक भाग होता. तेंव्हा त्याला पूर्व पाकिस्तान असे म्हंटले जायचे. पाकिस्तानच्या राजवटीत बांगलादेशातील नागरिकांवर अनन्वित अत्याचार होत होते. बांगलादेश हा पाकिस्तानचा घटक असूनही बांगलादेशी नागरिकांवर पाकिस्तान जुलुम करत होता. पाकिस्तानच्या जुलमी राजवटीला कंटाळून बांगलादेशचे तात्कालिन नेते शेख मुजिबिर रहेमान यांनी पाकिस्तानी सरकार विरुद्ध बंड पुकारले. त्यांच्या या बंडास बांगलादेशी नागरिकांनी प्रतिसाद दिला आणि लोक रस्त्यांवर उतरले मात्र पाकिस्तानने दडपशाही मार्गाने हे आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला तेंव्हा शेख मुजीबिर रेहमान यांनी भारताच्या तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याकडे मदतीची याचना केली. इंदिरा गांधी यांनी तत्काळ बांगलादेशी नागरिकांना पाठिंबा दिला आणि भारतीय लष्कराने पाकिस्तानशी मुकाबला करून बांगलादेशला पाकिस्तानच्या गुलामीतून मुक्त केले. पाकिस्तानच्या निर्मितीत भारताचा मोठा वाटा आहे नव्हे भारतामुळेच बांगलादेशची निर्मिती झाली. पाकिस्तानच्या जुलमी राजवटीतून मुक्त झाल्या पासून बांगलादेश आणि भारताचे संबंध मैत्रीचे च राहिले आहेत. मोठ्या भावाच्या रुपात भारताने बांगलादेशला नेहमीच त्यांच्या संकटात मदत केली मात्र आता परिस्थिती बदलली आहे. बांगलादेश मधील सध्याचे सरकार आणि बांगलादेशी नागरिक भारताच्या उपकाराला विसरली असून भारतालाच शत्रू मानू लागली आहेत. बांगलादेशात सध्या भारता विरुद्ध मोठा जनक्षोभ पाहायला मिळत आहे. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे सरकार पाडून तेथील कट्टरपंथीयांनी सत्ता हस्तगत केली. कट्टरपंथीय, लष्कर आणि जनतेचा रोष पाहून शेख हसीना यांनी भारतात पलायन केले. शेख हसीना यांचे भारताशी सौहार्दाचे संबंध होते म्हणूनच भारताने त्यांना भारतात आश्रय दिला कदाचित हेच तेथील नवनियुक्त सरकारला आणि कट्टरपंथीयांना रुचले नसावे म्हणूनच त्यांनी बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्यांक नागरिकांना लक्ष करण्यास सुरुवात केले. गेल्या काही महिन्यात बांगलादेशातील हिंदूं मंदिरांवर आणि हिंदू नागरिकांवर हल्ले होऊ लागले. मागील काही महिन्यात बांगलादेशात हिंदूंवरील हल्ल्याच्या ३०० घटना घडल्या आहेत. यात काही नागरिकांना जीव देखील गमवावा लागला आहे. हिंदूंच्या मंदिरांवर आणि घरांवर जाणीवपूर्वक हल्ले केले जात आहेत. हिंदूंनी बांगलादेश सोडून जावे असे जाहीरपणे इशारे दिले जात आहेत. या कट्टरपंथीय हल्लेखोरांना रोखण्यात तेथील डॉ मोहंमद युनूस यांचे सरकार अपयशी ठरत आहे किंबहुना या हल्लेखोरांना तेच पाठीशी घालत आहेत. बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदूंचे संरक्षण करणे हे तेथील सरकारचे कर्तव्यच आहे मात्र आपले कर्तव्य विसरून तेथील सरकार कट्टरपंथीयांना मोकळीक देत आहे. इतकेच नाही तर बांगलादेशात भारत विरोधी वातावरण निर्माण व्हावे यासाठी प्रयत्न करत आहे. डॉ मोहंमद युनूस हे नोबेल पारितोषिक विजेते आहेत. त्यांची बांगलादेशचा हंगामी पंतप्रधानपदी निवड झाल्यावर भारताने त्याचे स्वागत केले होते. त्यांच्याकडून न्याय आणि समानतेची अपेक्षा होती मात्र आता ती अपेक्षा फोल ठरली. त्यांच्या कारकीर्दीत भारत आणि बांगलादेश यांच्यात मैत्रीचे संबंध प्रस्थापित होतील असे वाटले होते पण त्यांनी मात्र भारताशी पंगा घेण्याचेच ठरवले आहे. बांगलादेश नॅशनलिस्ट पक्षाचे नेते रहुल कबीर रिझवी यांनी आपल्या बायकोची साडी जाळून भारतीय मालावर बहिष्कार घालण्याचे आव्हान केले इतकेच नाही तर भारतीय प्रसार माध्यमांवर देखील बंदी घालण्याचे आव्हान केले. इतके सगळे होत असताना डॉ मोहंमद युनूस या कट्टरपंथीयांवर कोणतीही कारवाई करत नाहीत उलट त्यांची बाजू घेऊन भारतवरच आरोप करीत आहेत म्हणूनच आता बांगलादेशातील हिंदूंवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी आणि बांग्लादेशात भारता विरुद्ध वाढणारा जनक्षोभ कमी करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने हस्तक्षेप करावा आणि तिथे शांती सेना तैनात करावी. भारताने देखील या प्रकरणात बघ्याची भूमिका सोडून अहेसान फरामोश बांगलादेशला त्यांची जागा दाखवून द्यावी.
श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५