मुंबई : विधानसभा अध्यक्षपदी भाजपाचे आमदार राहुल नार्वेकर यांची निवड होणार आहे. राहुल नार्वेकर यांनी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला. त्यांच्या विरोधात एकही अर्ज दाखल झालेला नसल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली असून सोमवारी त्याची अधिकृत घोषणा होईल.
कालपासून विधिमंडळाचे ‘विशेष अधिवेशन’ सुरू आहे. शनिवारी, रविवार या दोन दिवसांत आमदारांना विधानसभा सदस्यत्वाची आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आली. हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी विधानसभेत आमदारांना शपथ दिली. यानंतर उद्या सोमवारी ९ डिसेंबर रोजी विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात येणार असल्याने अधिकृतपणे अर्ज दाखल करण्यात आले.
राहुल नार्वेकर यांच्या विरोधात विरोधी व इतर पक्षांकडून एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केलेला नाही. त्यामुळे राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आज दुपारी १२ वाजेपर्यंत होती. मात्र इतर कोणत्याही पक्षाच्या एकही उमेदवाराने अर्ज दाखल केलेला नाही. यावेळी महायुतीकडे प्रचंड संख्याबळ आहे. त्यामुळे विरोधीगटाकून अर्ज करण्यात आले नाही
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केले आणि भाजपसोबत सत्ता स्थापन केली. यानंतर भाजपने विधानसभा अध्यक्षपदावर दावा करत त्याची जबाबदारी राहुल नार्वेकरांकडे दिली. यानंतर आता पुन्हा एकदा राहुल नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष होणार असं आता जवळपास निश्चित झाले आहे. यामुळे विधानसभेच्या अध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा शपथ घेणारे महाराष्ट्रातील पहिले अध्यक्ष म्हणून त्यांची नोंद केली जाणार आहे.
राहुल नार्वेकर हे वकील असून त्यांनी शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. राहुल नार्वेकरांनी शरद पवारांच्या नेतृत्वाखालील मुळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. २०१९ च्या निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. यानंतर त्यांनी दक्षिण मुंबईतील कुलाबा मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवून विजय मिळवला.
यावेळी विधानसभा २०२४ च्या निवडणुकीत देखील त्यांनी याच मतदारसंघातून निवडणूक लढविली आणि विजयी झाले. नार्वेकर २०२२ मध्ये महायुतीचे सरकार आल्यानंतर विधानसभा अध्यक्षपदी विराजमान झाले. त्यावेळी त्यांचे सासरे रामराजे नाईक निंबाळकर महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती होते. त्यामुळे एकाचवेळी सासरे जावई विधिमंडळाच्या दोन सभागृहांचे पीठासीन अधिकारी म्हणून कार्यरत होते. हा चर्चेचा विषय झाला होता.सर्वात कमी वयाचे विधानसभा अध्यक्ष म्हणून त्यांची नोंद झाली आहे.