नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने दिनांक ०८ डिसेंबर २०२४ रोजी उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली. नवी मुंबई महानगरपालिकेच्या २५ नागरी आरोग्य केंद्रांमार्फत खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांचे दवाखाने, सोसायटी कार्यालये, रूग्णालये, रेल्वे स्टेशन, बस डेपो, बाजारपेठ, टोल नाके इत्यादी विविध ठिकाणी ६०९ स्थायी, ७५ ट्रांझिट व २७ फिरते मोबाईल असे एकूण ७११ पोलिओ लसीकरण बूथ स्थापन करण्यात आले.
‘दोन थेंब प्रत्येक वेळी, पोलिओवर विजय दरवेळी’ – या घोषवाक्यास अनुसरून घरोघरी जाऊन नागरी आरोग्य केंद्रांच्या मार्फत पोलिओ लसीकरण मोहीमेची जनजागृती करून पोलिओ लसीकरणाची माहिती पोहचविण्यात आली.
लसीकरण बूथवरील २ हजारहून अधिक कर्मचारी, स्वयंसेवक यांच्यामार्फत बालकांना पोलिओ लस पाजण्यात आली. सदर दिवशी नमुंमपाचे ८३% इतके काम झाले आहे.
१०० % लाभार्थींना पल्स पोलिओ लस मिळावी याकरिता दि. ०९ डिसेंबर २०२४ ते दि. १३ डिसेंबर २०२४ या कालावधीत घरोघरी जाऊन पल्स पोलिओ डोस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार ज्या बालकांना रविवारी बूथवर जाऊन डोस घेता आलेला नाही, अशा बालकांसाठी विशेष मोहीम राबविली जात असून घरांना भेट देणा-या नमुंमपा मार्फत येणाऱ्या स्वयंसेवकांना संपूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.