पनवेल : ज्या ज्या वेळी आपल्यावर अन्याय होतो त्यावेळी सर्वांनी एकत्रित येऊन त्या विरोधात आवाज उठवायला पाहिजे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पनवेल तालुका पोलिस ठाण्याजवळ सुरु असलेल्या आमरण उपोषणावेळी केले. अनुसूचित जातीच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी आरपीआयचे पनवेल महानगर जिल्हा क्षेत्राचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली शनिवार पासून सुरु असलेले आमरण उपोषण माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या उपस्थितीत सोमवारी सोडण्यात आले. तीन आरोपींपैंकी मुख्य आरोपीला अटक करण्यात आल्याने हे उपोषण मागे घेण्यात आले.
अनुसूचित जातीतील मुलीला लग्नाचे अमिष दाखवून तीच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपींविरोधात अॅट्रॉसीटी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल झाला असूनही आरोपीना अटक झाली नव्हती. त्यामुळे आरोपींना अटक करण्याची मागणी करत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांच्या उपस्थितीत आणि पनवेल महानगर जिल्हा क्षेत्राचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण शनिवारपासून सुरू होते. आरोपी शुभम पवार याने अनुसूचित जातीच्या मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तीचा वारंवार गैरफायदा घेत युवतीची फसवणूक केली होती. यासाठी त्याला वडील कृष्णा पवार आणि आई अर्चना पवार यांनी मदत केली. या प्रकरणी या तीनही आरोपीं विरुद्ध खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र या आरोपींना अटक करण्यात आली नव्हती. याच्या निषेधार्थ तसेच तरुणीला न्याय मिळवून देत आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पनवेल महानगर जिल्हा क्षेत्राचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पनवेल तालुका पोलिस ठाण्यासमोर आमरण उपोषण सुरु होते. या उपोषणाला रविवारी आमदार प्रशांत ठाकूर यांनीही भेट देऊन या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. दरम्यान या गुन्ह्यातील मुख्य आरोपी शुभम पवार याला पोलिसांनी सोमवारी अटक केली. त्यामुळे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याहस्ते नारळ पाणी पिऊन हे उपोषण सोडण्यात आले. यावेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, सरचिटणीस प्रल्हाद केणी, माजी नगरसेवक एकनाथ गायकवाड, प्रभाकर कांबळे, दिनेश जाधव, सुरेंद्र सोरटे, मिलींद कांबळे, प्रकाश कांबळे, नलिनी भाटकर, शारदाताई शिरोळे, सुशीला इंगळे, मल्हारी घाटविसावे, भारती कांबळे, चंद्रसेन कांबळे, अनिता साळवे, प्रशांत कांबळे, अनिल रोकडे, भास्कर ढोबळे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.