वाशी : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीनंतर विविध राजकीय पक्षांकडून ईव्हीएमबद्दल आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ईव्हीएममध्ये घोटाळा करून राज्यात भाजप-महायुतीचे सरकार निवडून आल्याचा आरोप महाविकास आघाडीने केला आहे. त्यामुळे यापुढील सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात, अशी आग्रही मागणी मविआकडून केली जात आहे. यासाठी ‘लोकशाही बचाव’चा नारा देत कोपरखैरणेत ईव्हीएमविरोधात स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली.
मविआच्या घटक पक्षांकडून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून आणि गावागावातून ईव्हीएमविरोधात जनजागृती केली जात आहे. याच प्रकारे नवी मुंबईतील कॉँग्रेसकडून रविवारी ईव्हीएमविरोधात सर्वसामान्य नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. कोपरखैरणे तालुका ब्लॉक काँग्रेस कमिटी आणि असंघटित कामगार कर्मचारी काँग्रेसतर्फे काँग्रेस जनसंपर्क कार्यालयात ‘लोकशाही बचाव’चा नारा देत बॅलेट पेपरच्या समर्थनार्थ आणि ईव्हीएमविरोधात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. या स्वाक्षरी मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सुमारे ८०० हून अधिक नागरिकांनी ईव्हीएमविरोधात आणि बॅलेट पेपरच्या समर्थनार्थ स्वाक्षरी केली. स्वाक्षरी मोहिमेच्या माध्यमातून नागरिकांनी निवडणूक प्रक्रियेबद्दलचा आक्रोश नोंदवला असल्याचे कोपरखैरणे तालुका-ब्लॉक कॉँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुनील पारकर यांनी सांगितले. लोकशाही अबाधित राखण्यासाठी आणि वाचविण्यासाठी सर्व नागरिकांनी एकत्र येऊन लढावे, असे आवाहन नवी मुंबई कॉँग्रेसच्या वतीने करण्यात आले.