क्षमा पाटेकरचा अष्टपैलू खेळ

ठाणे : सलग दुसऱ्यांदा सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू ठरलेल्या क्षमा पाटेकरच्या अष्टपैलू खेळामुळे गतविजेत्या राजावाडी क्रिकेट क्लबने व्हिक्टरी क्रिकेट क्लबचा सात फलंदाज राखून पराभव करत डॉ. राजेश मढवी स्पोर्ट्स असोसिएशन आणि दैवेज्ञ क्रिकेट क्लब आयोजित महिलांच्या एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान पक्के केले. क्षमा पाटेकरच्या नाबाद अर्धशतकी खेळीमुळे राजावाडी क्रिकेट क्लबने प्रतिस्पर्धी संघाचे १८६ धावांचे आव्हान तीन फलंदाजांच्या मोबदल्यात १९० धावा करत पार करत विजय निश्चित केला.

प्रथम फलंदाजी करताना प्रिशा देवरुखकर, नंदिता त्रिवेदी, क्रितिका यादव आणि अलिना मुल्लाने जबाबदारीपूर्ण फलंदाजी केली. प्रिशाने ४४ धावा बनवल्या. नंदिता आणि क्रितीकाने प्रत्येकी २७ धावांची भर टाकली. अलिनाने २२ धावा केल्या. या डावात क्षमाने तीन आणि दिक्षा पवारने दोन फलंदाज बाद केले.

माफक धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीला आलेल्या सलोनी कुष्टेने दोन महत्वपूर्ण भागिदाऱ्या रचत संघाला विजयाचा मार्ग मोकळा करून दिला. अर्धशतकी ६६ धावांची खेळी करताना सलोनीने किमया राणेच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी ४४ धावांची भागीदारी रचली. किमया २७ धावांवर बाद झाल्यावर सलोनीने क्षमाच्या साथीने दुसऱ्या विकेटसाठी ७४ धावांची भागीदारी केली. संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब करताना क्षमाने नाबाद ५५ धावा केल्या. निव्या आंब्रे १० धावांवर नाबाद राहिली. पुजा शाहने दोन आणि विधी मथुरियाने एक बळी मिळवला.

संक्षिप्त धावफलक : व्हिक्टरी क्रिकेट क्लब : ४० षटकात ९ बाद १८६ (प्रिशा देवरुखकर ४४, नंदिता त्रिवेदी २७, क्रितीका यादव २७, अलिना मुल्ला २२, क्षमा पाटेकर ८-३५-३,दिशा पवार ८-३०-२, वैष्णवी पोतदार ५-३३-१, निव्या आंब्रे ८-२२-१, निवेदी जैतपाल ४-१९-१) पराभूत विरुद्ध राजावाडी क्रिकेट क्लब : ३१.३ षटकात ३ बाद १९० (सलोनी कुष्टे ६६, क्षमा पाटेकर नाबाद ५५, किमया राणे २७, निव्या आंब्रे नाबाद १०,पुजा शाह ८-४४-२, विधी मथुरिया ७.३- ४१-१). सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू – क्षमा पाटेकर ( राजावाडी क्रिकेट क्लब).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *