राजीव चंदने
मुरबाड : रविवार, ८ डिसेंबरला तीन हात नाका मुरबाड ते श्रीराम मंदिर, मुरबाड येथे आज सकल हिंदू समाजाच्या वतीने शांततामय मार्गाने मुकमोर्चा काढण्यात आला. बांगलादेशातील हिंदू, आणि अन्य, अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. या मोर्चात शेकडो नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
मोर्चाचा उद्देश बांगलादेशातील हिंदूंवर होणारे धार्मिक अत्याचार थांबवण्यासाठी जागतिक पातळीवर दखल घेतली जावी आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने ठोस उपाययोजना कराव्यात, असा होता. इस्कॉन साधूंच्या तातडीने मुक्ततेची मागणीही करण्यात आली.
विशेषतः बांगलादेशातील जिहादी कट्टरपंथीयांकडून मंदिरे, घरे उद्ध्वस्त करणे, तसेच मानवी हक्कांचे उल्लंघन यावर तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. मोर्चेकऱ्यांनी मानवी साखळी तयार करत शांततेत बांगलादेश सरकार व आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे आपला आवाज पोहोचवण्याचा प्रयत्न केला.
मुरबाड बस स्थानका जवळील असलेल्या भारतीय ध्वजस्तंभ येथे राष्ट्रगीत गायन करून मोर्चाची सुरवात करण्यात आली. व शेवटी श्रीराम मंदिर येथे पसायदानाने सांगता करण्यात आली. मंगळवारी तहसीलदार मुरबाड यांना निवेदन देऊन या मागण्यांची पूर्तता करण्याची विनंती करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर हिंदू समाजाच्या सुरक्षेसाठी कडक उपाययोजनांची मागणी या निवेदनात करण्यात येणार आहे.