स्वाती घोसाळकर
मुंबई : महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीचाचा मुहुर्त अखेर ठरलाय. येत्या शनिवारी दिनांक १४ नोव्हेंबरला मंत्रिमंडळाचा शपथविधी होईल अशी माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे. १५ नोव्हेंबरला नागपुरात हिवाळी अधिवेशनाचे चहापान आहे आणि १६ नोव्हेंबरला नागपुरमध्ये हिवाळी अधिवेशनाला सुरवात होणार आहे.
या मंत्रिमंडळालाच्या शपथविधीसाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मंत्रिमंडळाची यादी तयार झाली असून भाजपाची अंतिम यादीला दिल्लीवरून मंजुरी मिळण्याची प्रतिक्षा असल्याचे सुत्रांनी सांगितले. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या यादीत फारसे बदल नसले तरी भाजपाच्या यादीत मात्र धक्कादायक नावे दिसणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.
शिवसेनेचे अब्दुल सत्तार आणि संजय राठोड हे दोन्ही मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नव्या मंत्रिमंडळात नसतील. त्यांची कामगिरी समाधानकारक नसल्याने त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान मागील सरकारमध्ये मंत्री असलेले उदय सामंत, शंभूराजे देसाई, तानाजी सावंत, दादा भुसे, दिपक केसरकर, या मंत्र्यांना पुन्हा संधि मिळेल असे सुत्रांचे म्हणणे आहे.
शिंदेंच्या मंत्रिमंडळात नव्या पाच जणांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यात भरत गोगावले, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, अजून खोतकर, विजय शिवतारे यांची नावे असल्याचे सुत्रांनी सांगितले. महायुतीमध्ये शिवसेनेला 13 ते 14 मंत्री पद मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान आमदार संजय राठोड यांनी पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे जो निर्णय देतील तो मान्य असेल असं वक्तव्य केलं आहे. मला माझ्या मतदारसंघातील जनतेने पाचव्यांदा निवडून पाठवले आहे. मी माझ्या मतदारसंघाला न्याय देण्याचा प्रयत्न करेन, त्यांची कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन त्यांनी मला वेगवेगळ्या पदावर काम करण्याची संधी दिली आहे, म्हणून चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला आहे.