अनिल ठाणेकर
ठाणे : व्हीएमविरोधी आंदोलनासंदर्भात, मंगळवारपासून, ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने जनजागृत्ती मोहिम सुरु करण्यात आली असून ठाणे शहरातील विविध महत्त्वाच्या ठिकाणी, ‘धर्मराज्य पक्षा’चे कार्यकर्ते “ईव्हीएम हटवा, लोकशाही वाचवा” या घोषणेखाली मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत, अशी माहिती धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे यांनी दिली. यावेळी प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ विश्वास उटगी हे ही उपस्थित होते.
महायुतीतील पक्षांचा विजय ‘न भूतो’ असा ऐतिहासिक; तर, यांच्या तथाकथित कार्यकर्त्यांखेरीज रस्तोरस्ती जनतेचा उत्स्फूर्त आनंदोत्सव का दिसला नाही ? ईव्हीएम स्टॅन्ड अलोट म्हणजेच इंटरनेट, वायफाय अथवा ‘ब्लूटूथ’शी जोडलेलं नसल्याने ईव्हीएम हॅक करता येत नसलं; तरी, त्यातला मतमोजणीचा निकाल ‘प्रोग्रॅम’ करुन हवा तसा ‘मॅनेज’ करणे हा संगणकतज्ज्ञांच्या डाव्या हातचा मळ आहे. हुकूमशाहीच्या ‘राक्षसाचा प्राण’ ईव्हीएमच्या पोपटात दडलेला आहे. हा पोपट मारा,तरच राक्षस मरेल अन्यथा लोकशाहीची शंभरी भरेल, जिंकलात तर स्वतःमुळे आणि हरलात तर ईव्हीएममुळे या विरोधी पक्षांवरील ‘सर्वोच्च न्यायालया’च्या अर्वाच्य टीकेचा धि:क्कार करायला हवा. ईव्हीएम हवे की, नको हा सवाल, राजकीय पक्षांचा कमी आणि आम जनतेचा जास्त आहे.आम्ही देशाचे मालक आहोत.तुम्ही सारे, आमच्यातर्फे नेमले गेलेले ‘पगारी नोकर’ आहात. उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालय, हे राज्यघटनेचे ‘रक्षक’ म्हणून नेमले गेलेले आहेत.ही न्यायालये, सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालची मांजरे नव्हेत. तेव्हा, ईव्हीएममधून ‘मतचोरी’ होत असताना; त्यांनी वाघासारखं गुरगुरले पाहिजे आणि पंजा मारुन ईव्हीएमला आडवे केले पाहिजे. ज्यांनी स्वातंत्र्य-चळवळीत कधी ‘भाग’ घेतला नाही.तेच आज, आपल्या ‘स्वातंत्र्या’चा ‘घास’ घ्यायला निघालेत. तेव्हा ते घाबरले ‘बुलेट’ला, आज ‘बॅलेट’ला. निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय.देशातील नागरिकांची अत्यंत लाजिरवाणी व क्रूर चेष्टा करत आहेत..दिलेली मते ईव्हीएममध्ये दिसत नव्हती; म्हणून त्यांनी व्हीव्हीपीएटी आणले परंतु, मते मोजतायत कुठली; तर, न दिसणारी ईव्हीएम मधलीच, मतपत्रिका मोजणे, हे एव्हरेस्ट शिखर चढण्याएवढे वा डोंगर खोदण्याएवढं अवघड काम आहे काय ? जरी संपूर्ण जगाने ईव्हीएमचा त्याग केलेला असला तरी ईव्हीएममुळे ‘सत्ताधारी’ बनलेले, कुठल्याही स्थितीत ईव्हीएमशिवाय निवडणूक लढवणे शक्यच नाही; त्यासाठी, स्वातंत्र्याची दुसरी लढाई लढावी लागेल. तुरुंगवास पत्करण्याची आणि स्वतःचे रक्त सांडवण्याची तयारी ठेवावी लागेल. ईव्हीएम मॅनेज होवोत वा न होवोत, ती एकूणच संशयास्पद प्रक्रिया आहे, असे एलिऑन मस्कसह, अवघे जग म्हणत असताना कुठल्याही परिस्थितीत ईव्हीएमशिवायच कागदी-मतपत्रिकेवर शिक्का मारुन निवडणुका व्हायला पाहिजे, हा, या प्रजासत्ताकाचा ‘जनादेश’ आहे…मग, प्रश्नच कुठे येतो? जनता आता जागी झाली आहे.आपल्या बहुमूल्य मतांची ईव्हीएमच्या तिजोरीमधून राजरोस ‘चोरी’ होतेय; हे तिला उमगले आहे. ती तुमच्याच दिशेने चाल करुन येते आहे. तेव्हा सत्ताधाऱ्यांनो, मतपत्रिकेवर निवडून या; नाहीतर, खुर्च्या खाली करा.देशात ‘ईव्हीएम’वर सुयोग्यरित्या पार पडलेली ‘शेवटची’ निवडणूक.ही, २०१४ ची लोकसभा-निवडणूक होती. जसजसा २०१४ नंतर ‘निवडणूक-आयोग’ सत्ताधाऱ्यांचा ‘बटीक’ बनत गेला; तसतशी ईव्हीएममध्ये ‘हेराफेरी’ सुरु झाली. त्यातूनच, जनतेला संशय येऊ नये, अशा पद्धतीने, कुठल्या निवडणुका ‘हेराफेरी’तून जिंकायच्या आणि कुठे ‘हेराफेरी’ टाळायची (त्या बहुतेक ठिकाणी सत्ताधारी पराभूत).याची, पद्धतशीर गणितं मांडली जायला लागली.पारदर्शक मतदान, भारतीय ‘प्रजासत्ताका’तील नागरिकांचा ‘घटनात्मक-अधिकार’.सरकार, निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय यांनी मिळून देशातील मतदारांची ‘माकडचेष्टा’ चालवलीय काय. मारकडवाडीत स्थानिकांतर्फे आयोजित मतपत्रिकेद्वारे जनमताची पारदर्शक चाचणी-चाचपणी करणारा ‘फेरनिवडणूक-प्रयोग’ पाशवी पोलिसी-बळावर का मोडून काढण्यात आला.सरकारला जनतेचे भय वाटू लागलेय; याचा सरळ अर्थ, “देशात ‘हुकूमशाही आणि झोटिंगशाही’ आली आहे.अमेरिकन जनतेला मतांची मोजणी दीर्घकाळ चालू शकते मग, तत्काळ निकालांसाठी आतूर झालेला आपला देश, काय अमेरिकेला मागे टाकून ‘सुपरसाॅनिक जेट युगा’त वावरतोय? कुणी म्हणेल, ईव्हीएमच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या ‘जेट-विमाना’तून प्रवास सोडून; काय कागदी-मतपत्रिकेच्या ‘बैलगाडी’तून प्रवास करायचा? तर, त्याचं उत्तर हेच की, अपघात जेट विमानालाच होतात.बैलगाडीला नव्हे आणि आपला देश, ‘प्रजासत्ताक’ राखण्याकामी आमचा मतदानाचा हक्क एवढा महत्त्वपूर्ण व पवित्र आहे की, आम्ही एकवेळ निर्धोक मंदगती बैलगाडीकडे वळू; पण, जेट-विमानाचा धोका बिलकूल पत्करणार नाही.बॅलेट-पेपर घोटाळ्याने हाताच्या बोटावर मोजण्याएवढ्या मतदारसंघात गडबड होईल सीसीटीव्ही, मोबाईलसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाने, ते ही जवळपास अशक्यच पण, ईव्हीएममुळे होते काय की, निवडणूक-निकालानंतर जे एकतर संसदेत वा विधिमंडळात विरोधी बाकांवर बसायला अथवा तुरुंगात जायला हवेत ते थेट सत्तेच्या खुर्च्या बळकावून बसतात. आपली ‘लोकशाही’ ही मतपत्रिकेद्वारा पारदर्शक ‘व्होटिंगशाही’ नसून; ईव्हीएमद्वारा मतांचा ‘झोल’ करणारी ‘झोटिगशाही’ आहे, असे मत धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे यांनी व्यक्त केले.
0000