नाशिक : राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागात एप्रिल ते नोव्हेंबर २०२४ या नऊ महिन्यांच्या कालावधीत बसचे एकूण १२० अपघात होऊन त्यामध्ये २२ जणांचा मृत्यू तर, १९६ जण जायबंदी झाले. महत्वाची बाब म्हणजे चालकाच्या चुकीमुळे सर्वाधिक ४६ तर, अन्य चालकांच्या चुकीमुळे ३४ अपघात झाले. या आकडेवारीत सर्वाधिक ९९ अपघात हे साध्या आणि हिरकणी बसचे तर १५ शिवशाहीचे आहेत.
महामार्ग बस स्थानकात अलीकडेच चालकाचे नियंत्रण सुटून इ बस थेट नियंत्रण कक्षास धडकली आणि बसच्या प्रतिक्षेत थांबलेले प्रवासी त्याखाली सापडले. यामध्ये एका महिलेचा मृत्यू तर तीन प्रवासी गंभीर जखमी झाले होते. चालकाने बस सुरू करताच मोठा आवाज होऊन उसळी घेत ती समोरील नियंत्रण कक्षास धडकली. प्रथमदर्शनी हा अपघात चालकाच्या चुकीमुळे झाल्याचे प्रादेशिक परिवहन विभागाने म्हटले आहे. प्रादेशिक परिवहनसह एसटी महामंडळाकडून तांत्रिक बाबींची तपासणी केली जाणार आहे. महामंडळाच्या नाशिक विभागात अपघातांचा आलेख उंचावत असल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे.
एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत एसटी अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये दोन प्रवासी, पाच पादचारी व सायकलस्वार, दोन दुचाकीवरील व्यक्ती, १० त्रयस्थ वाहनातील व्यक्ती दोन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे, या अपघातांमध्ये १९६ जण जखमी झाले. यात बसमधील १३९ प्रवासी, पाच पादचारी व सायकलस्वार, १३ दुचाकीवरील व्यक्ती, २२ त्रयस्थ वाहनातील व्यक्ती तर १२ महामंडळाचे कर्मचारी असल्याचे नाशिक विभागाच्या अपघात अहवालात म्हटले आहे. अपघातात जखमी झालेल्यांमध्ये सर्वाधिक संख्या साध्या, हिरकणी बसमधील प्रवाशांची आहे.
स्वमालकीच्या बस अपघातग्रस्त होण्याची संख्या अधिक
नऊ महिन्यात राज्य परिवहनच्या स्वमालकीच्या ११६ बस तर, चार भाडेतत्वावर घेतलेल्या इ बस अपघातग्रस्त झाल्या. यात स्वमालकीच्या ९९ साध्या आणि हिरकणी बस, १५ शिवशाही आणि दोन शिवनेरी बसचा समावेश आहे.
अधिक्याने चालकाची चूक कारक
नऊ महिन्यात झालेल्या अपघातांची कारणमिंमासा महामंडळाने केली आहे. चालकाच्या चुकीमुळे बसला सर्वाधिक ४६ अपघात झाले. अन्य वाहकाच्या चुकीमुळे २९ साध्या व हिरकणी, पाच शिवशाही आणि दोन इ बस अपघातग्रस्त झाल्या. पादचाऱ्यांच्या चुकीमुळे तीन बस अपघात झाले. २२ अपघातात दोन्ही चालकांची चूक वा अन्य कारणे असल्याचे अहवालात म्हटले आहे.
०००००