मुंबई: लोकसभेत गौतम अदाणी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मैत्रीमुळे रोज हल्लाबोल होत असतानाच आज गौतम अदाणीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेटीसाठी सागर बंगला गाठला. त्यांच्या या भेटीमुळे चर्चांना उधाण आले आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार, दुपारी 12 च्या सुमारास उद्योजक गौतम अदानी हे देवेंद्र फडणवीस यांच्या मलबार हिल येथील सागर बंगल्यावर दाखल झाले. गौतम अदानी हे फडणवीसांना का भेटायला आले आहेत, याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रि‍पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर ही सदिच्छा भेट असू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. परंतु, गौतम अदानी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात नेमकी काय चर्चा झाली असावी, याबद्दल राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजप आणि गौतम अदानी यांच्या कनेक्शनवरुन टीकेची झोड उठवली होती. विशेषत: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी गौतम अदानी आणि पंतप्रधान मोदी यांच्यातील कथित साटेलोटे असल्याचा मुद्दा वारंवार उपस्थित केला होता.

याशिवाय, मुंबईतील धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या मुद्द्यावरूनही अदानी आणि भाजप यांना विरोधकांनी लक्ष्य केले होते. धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या माध्यमातून शेकडो एकर जागा अदानींच्या घशात जाईल आणि स्थानिक रहिवाशांना निवास आणि रोजगार सोडून इतरत्र स्थलांतरित करण्याचा डाव असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी वारंवार केला होता. उद्धव ठाकरे यांनीही धारावी पुनर्विकास प्रकल्पाला कडाडून विरोध केला होता. मविआची सत्ता आल्यास धारावी पुनर्विकास प्रकल्पाला स्थगिती देऊ, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. मात्र, आता राज्यात महायुती एकहाती सत्ता आली आहे. या पार्श्वभूमीवर गौतम अदानी आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *