नवी दिल्ली : राज्यसभेच्या इतिहासात न घडलेली घटना यंदा घडली आहे. राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती जयदीप धनखड यांच्याविरोधात विरोधी पक्षांनी अविश्वास प्रस्ताव आणला आहे. इंडिया आघाडीतील पक्षांनी राज्यसभेचे सभापती जयदीप धनखड यांच्याविरोधात राज्यसभेच्या मुख्य सचिवांकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे अशी माहीती काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांनी दिली. भारताच्या संसदीय इतिहासातील अशा प्रकारची ही पहिलीच घटना ठरली.
या अविश्वास प्रस्तावावर सुमारे ७० खासदारांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. त्यात काँग्रेस, बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस, अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष, अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष, तामिळनाडूचा द्रमुक आणि लालू यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाच्या सदस्यांचा समावेश आहे. राज्यसभेतील संख्याबळ पाहता हा प्रस्ताव नामंजूर होण्याची शक्यता आहे. मात्र विरोधकांना सभापती त्यांना सभागृहात बोलण्याची संधी देत नाहीत, हे सिद्ध करायचे आहे.
आज दोन्ही सभागृहांचे कामकाज चालू झाले तेव्हा सत्ताधाऱ्यांनी जॉर्ज सोरोस यांचा तर विरोधीपक्षांनी उद्योगपती गौतम अदाणी यांचा मुद्दा उचलून धरला आहे. या मुद्द्यांवरूनच सत्ताधारी तसेच विरोधकांनी केलेल्या गोंधळानंतर आधी लोकसभेची तर नंतर राज्यसभेची कार्यवाही उद्या सकाळी ११ पर्यंत स्थगित करण्यात आली आहे. दोन्ही सभागृहांचे कामकाज स्थगित केल्यानंतर विरोधी पक्षांच्या खासदारांनी संसद भवन परिसरात जोरदार घोषणाबाजी करत अदाणी यांच्याबाबतच्या मुद्द्यांवर सरकारकडून उत्तराची मागणी केली.
यापूर्वी आज सकाळ अदाणी मुद्द्यावरून संसदेच्या संकुलात विरोधकांनी निदर्शने केली. यावेळी त्यांनी खांद्याला एक काळी पिशवी अडकवली होती, ज्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदाणी यांची व्यंगचित्रे छापली होती. तसेच यावर मोदी-अदाणी भाई-भाई असे लिहिले होते. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, प्रियांका गांधीयांच्यासह काँग्रेस, द्रमुक, डावे आणि इतर पक्षांच्या खासदारांनी मकर द्वारसमोर ही निदर्शने केली.