धर्म हा आदर्श जीवनाचा आधार आहे. स्वतः सुखाने जगण्याची आणि दुसऱ्यांना सुखाने जगू देण्याची. सर्वांना सुखाने जगावे असे वाटते. दुःखापासून मुक्त असे जीवन सर्वांना पाहिजे असते. पण जोवर खरे सुख म्हणजे काय हे आम्हांला समजत नाही किंवा सुख कसे लाभेल, हेही कळत नाही, तोपर्यंत आपण खोटया सुखाच्या मागे बावळयाप्रमाणे धावत सुटतो. या सुखापासून दूर जाऊन अधिकाधिक दुःखी होतो, आणि स्वतःलाच नव्हे तर दुसऱ्यांनाही दुःखी करतो.
आंतरिक शांतीमध्ये खरे सुख सामाविले आहे. आंतरिक शांती ही मन विकारविहीन करण्याने लाभते. चित्ताच्या निर्मळतेमुळे लाभते. चित्त विकारविहीन अवस्थेत असणे, म्हणजेच खरी सुखशांती देणारी अवस्था.
ज्या माणसाला निर्मळ चित्ताने जगता येते, तोच खरी शांती आणि सुख भोगू शकतो. जो मनुष्य जितका विकारमुक्त होऊन राहतो, तितका तो दुःखमुक्त होतो, जीवन जगण्याची खरी कला जाणतो. आणि तितकाच या अर्थाने धार्मिक होतो. निर्मळ चित्ताने जे आचरण घडते तोच धर्म, तीच जगण्याची कला. त्या कलेत जो जितका निपुण, तितका तो अधिक धार्मिक असतो. धार्मिक या शब्दाची खरी परिभाषा हीच.
प्रकृतीचा एक अतूट नियम आहे. त्यालाच कोणी सत्य म्हणावे. किंवा धर्मनियम म्हणावे, कोणतेही नाव दिले तरी त्यामुळे काही फरक होत नाही. तो नियम असा, की अमुक केले म्हणजे त्याचा अमुक परिणाम होतो. ते तसे केले नाही, तर त्याचा तसा परिणामही होणार नाही. विशिष्ट कारणामुळे जे कार्य घडते, ते कारणच नसेल तर ते कार्यही घडत नाही. या नियमाप्रमाणे जेव्हा जेव्हा आमचे मन द्वेष, दुष्टपणा, क्रोध, ईर्षा इत्यादि विकारांनी आक्रांत होते, तेव्हा तेव्हा आम्ही व्याकुळ होतो, दुःखाने संतप्त होऊन सुख गमावून बसतो. जेव्हा जेव्हा अशा विकारांनी आमचे मन संतप्त होत नाही, तेव्हा तेव्हा आम्ही व्याकुळ होत नाही, दुःखसंतप्त होत नाही. आंतरिक सुखशांतीचे आपले आपण मालक होऊन राहतो.
विकारांपासून मुक्त होण्यास जो शिकवितो, तोच आदर्श जीवनाचा आधार आहे. तोच शुद्ध धर्म आहे शुद्ध धर्माचे स्वरूप अतिशय मंगलमय आणि कल्याणप्रद आहे, आम्ही जेव्हा विकारांपासून मुक्त होऊन निर्मळ मनाने आचरण करतो, तेव्हा स्वतःतर सुखशांती भोगतोच, पण दुसऱ्यांनाही सुखशांती मिळण्यास कारण होतो. याच प्रकारे जेव्हा जेव्हा विकारग्रस्त होऊन मलिन चित्ताने आचरण करतो, तेव्हा तेव्हा स्वतःतर संतप्त होतोच, पण दुसऱ्यांनाही संतप्त करण्यास कारण होतो. समाजातील शांती नष्ट करतो.
क्रोध, लोभ, वासना, भय, मत्सर, ईर्षा, अहंकार इत्यादि मनोविकारांकडून आमची शिकार होते, आणि आम्ही हत्या, चोरी, व्यभिचार, असत्य, लबाडी, कपट, चुगली, परनिंदा, व्यर्थ बडबड करीत राहतो. कडवट बोलतो, आणि आम्ही असे करू लागलो, म्हणजे स्वतःचा आणि दुसऱ्यांचाही संताप वाढवितो. कोणतेही शारीरिक किंवा वाणीचे दुष्कर्म हे मनोविकाराखेरीज घडत नाही. पण मनोविकार उत्पन्न झाल्यावरही कायिक किंवा वाचिक दुष्कर्म टाळताच येणार नाही असे नाही. सामान्यतः प्रबल मनोविकार उत्पन्न होऊनही स्वतःवर संयम ठेवून कायिक व वाचिक दुष्कर्मापासून आम्ही स्वतःचा बचाव करु शकतो. त्यामुळे प्रत्यक्ष दुसऱ्याचे नुकसान आमच्या हातून होत नाही. पण दूषित मनोविकारांनी मन गजबजून स्वतःव्याकुळ होतो, तेव्हा मानसिक दुष्कर्म हातून होतच राहते. त्यामुळे स्वतःच्या मनाची शांती जाते आणि अप्रत्यक्षपणे इतरांचीही शांती आपण नष्ट करतो. आमच्या मनातील दूषित तरंग आसपासच्या वातावरणावर प्रभाव पाडल्याखेरीज आणि ते दूषित केल्याखेरीज राहत नाहीत.
जेव्हा जेव्हा आमचे मन विकारांपासून मुक्त होऊन निर्मळ होते, तेव्हा स्वाभाविकपणेच ते स्नेह आणि सद्भाव, मैत्री आणि करुणा यांनी भरुन येते. अशा वेळी सुख व शांती यांचा स्वतःला तर अनुभव येतोच पण अप्रत्यक्षपणे दुसऱ्यांनाही सुखशांती देण्यास आपण कारण होतो. आमच्या निर्मळ मनाचे तरंग आसपासच्या वातावरणात पसरून यथाशक्ती ते वातावरणही निर्मळ होते.
एवढ्यावरून आत्मदमन म्हणजे धर्माची सर्वांगीण संपूर्णता नाही, पण ते धर्म आचरणात आणणारे पहिले पाऊल आहे. प्रथम संयमाने कायिक आणि वाचिक दुष्कर्मापासून दूर राहिले पाहिजे आणि मग सतत अभ्यासाने मानसिक दुष्कर्मापासूनही दूर गेले पाहिजे. मानसिक दुष्कर्मापासून दूर जाणे याचा अर्थ मानसिक विकारांपासून मुक्त होणे. विकारांपासून मुक्त झालेले निर्मळ मन आपल्या सहज स्वभावानेच मानसिक, वाचिक किंवा शारीरिक दुष्कर्म करणार नाही. म्हणूनच मुख्य गोष्ट कोणती असेल, तर आपले मन विकारांपासून विमुक्त राखणे.
आपण आपल्या प्रत्येक कृतीबद्दल जागरूक राहून ती कृती दोषमुक्त केली पाहिजे. आपले मन आणि मनातील विकार यांबद्दल जागरूक राहूनच त्याला विकारमुक्त करता येईल. याबाबतीत अजाण किंवा निष्काळजी राहिलो तर मनाची स्वच्छता कायम ठेवता येणार नाही. यासाठी आपले शरीर, वाचा आणि मन यांच्याकडून घडणारी कर्मे आणि आपले मन आणि चित्तवृत्ती यांचे सतत निरीक्षण करण्याचा अभ्यास म्हणजेच धर्म आचरणात आणण्याचा खरा अभ्यास होय. कोणतेही कर्म करण्याआधी व करताना, या कर्मामुळे माझे व इतरांचे कल्याण होईल की अकल्याण हे तपासले पाहिजे. जर मंगल होणार असेल तर ते काम करावे, नाहीतर करू नये. अशा रीतीने योग्य विवेकपूर्वक तपास करून केलेले कर्म हे सर्व मंगलमयच होईल, म्हणजेच धर्ममय होईल. स्वतःला अगर दुसऱ्यांना अहितकारक असे कायिक किंवा वाचिक दुष्कर्म अनवधानाने, तपास न घेता केले गेले तर त्याबद्दल प्रायश्चित घेतांना रडून भेकून अपराधाच्या जाणिवेची गाठ मनात बांधून ग्रस्त होऊ नये. उलट लवकरात लवकर आपल्या सोबतीचे साधक किंवा गुरुजन यांच्यासमोर आपली चूक प्रकट करावी आणि आपल्या मनावरचा भार काढून टाकावा तसेच भविष्य काळी अधिक सावधान राहण्याचा संकल्प करावा. मनाची जागरूकताही अशाच अभ्यासाने वाढवावी. जेव्हा जेव्हा चित्तात विकार जागा होईल, तेव्हा त्याचे निरीक्षण करावे. साक्षी राहून निरीक्षण करू लागल्यास तो विकार दुर्बल होत होत नष्ट होऊन जाईल. अनवधानाने, निरीक्षण न केल्यामुळे तो विकार आपल्यावर स्वार झाला तर त्याच्या आठवणीने रडत बसू नये. उलट अधिक सावधान राहण्याचा संकल्प करावा आणि जागरूकतेचा अभ्यास वाढवावा. शुद्ध धर्मामध्ये सुस्थिर होण्याची ही शास्त्रीय पद्धती आहे.
ज्या अभ्यासाने आपल्या कर्माबद्दलची जागरूकता आणि सावधानता वाढते, तोच शुद्ध धर्माचा अभ्यास. ज्या विधीने आपल्या कृतीला सुधारणारी चित्ताची निर्मलता वाढते तोच धर्मविधी होय. आत्मनिरीक्षण करताना आलेल्या अनुभूतीच्या बळावर जेव्हा आपण पाहतो, तेव्हा प्रत्येक दुष्कर्माचे कारण आपल्या चित्ताची मलिनता असल्याचे आढळते. कोणता ना कोणता मनोविकार दुष्कर्मामागे असतो.
त्याबरोबर असेही दिसते की, प्रत्येक विकाराचे कारण आपल्या ‘मी’ पणाबद्दल निर्माण झालेली कमालीची आसक्ती हे असते. या आंधळ्या आसक्तीमुळे या ‘मी’ ला भलतेच महत्त्व देऊन आपण चिकटून बसतो, तेव्हा एका लहानशा रिंगणात अडकून मन मलिन करून कोणते तरी असे कर्म करतो, की जे अखेरीस हिताचे होत नाही.
आत्मनिरीक्षणाचा अभ्यास करताना आलेल्या अनुभूतींच्या बळावर सुद्धा हे स्पष्ट दिसते की, जेव्हा स्वार्थंध होऊन आम्ही विकारग्रस्त होतो, तेव्हा इतरांचे अहित तर करतोच, पण आपलाही खरा स्वार्थ साधत नाही. जेव्हा या स्वार्थंधतेपासून मुक्त होतो, तेव्हा आत्महित आणि परहित दोन्हीही साधतात. आत्महित आणि परहित साधणारे कृत्य हाच धर्म. आपल्या लाभाबरोबर दुसऱ्याचाही लाभ साधणे हाच धर्म आहे. जेव्हा कुणाचेही अनहित होते, तेव्हा अधर्मच होतो. स्वतःचा व दुसऱ्याचा उदय करणारे सामंजस्यपूर्ण स्वस्थ जीवन हाच धर्म आहे. आपला उदय व दुसऱ्याचा उदय हे एकमेकांवर अवलंबून आहेत.
आमचे सत्कर्म किंवा दुष्कर्म केवळ आपल्यालाच सुखी वा दुःखी करीत नाही, तर आपल्याबरोबरीच्या इतरांनाही तसे करते. मनुष्य हा समाजातील इतरांबरोबर राहतो. मनुष्य हे समाजाशी निगडीत असे अंग आहे. समाजाचे परिणाम त्याच्यावर होतात, तसेच त्याचेही थोडेबहुत परिणाम समाजावर होत असतात म्हणून धर्म साधून जेव्हा आम्ही नैतिक जीवन जगतो, दुष्कर्मापासून स्वतःला बचावून सत्कर्म करू लागतो, तेव्हा आपले स्वतःचेच भले करीत नाही तर इतरांचेही करतो.
धर्मसाधन जीवनमूल्यांसाठी आहे. धर्माचा अभ्यास करूनही आमची जीवनमूल्ये उच्च झाली नाहीत, आमचा लोकव्यवहार सुधारला नाही, आम्ही आमच्यासाठी किंवा इतरांसाठी मंगलमय जीवन जगू शकलो नाही, तर असा धर्म आम्हांला काय उपयोगी ? आणि इतरांना तरी तो काय उपयोगाचा ? आमचे पारंपरिक संबंध सुधारावेत, यासाठी धर्म आहे. आम्हांला व्यवहारातील कौशल्य यावे, यासाठी धर्म आहे. परिवार, समाज, जाती, राष्ट्र आणि राष्ट्र-राष्ट्रे यांतील सर्व पारंपरिक सबंध हे व्यक्तिव्यक्तीतील संबंधावर अवलंबून आहेत. म्हणून प्रत्येक व्यक्तीने याच जीवनात दुसऱ्याबरोबरचे आपले व्यवहारिक संबंध सुधारावे, हाच शुद्ध धर्म आहे. याच जीवनात सुखाने आणि शांतीने जगण्यासाठी धर्म आहे. मृत्यूनंतर आकाशातील मेघांच्यावर असणाऱ्या कोणत्या तरी अज्ञात स्वर्गातील जीवन जगण्यासाठी धर्म नाही. तसेच मृत्यूनंतर पृथ्वीच्या खाली माहीत नसलेल्या नरकापासून बचाव करण्यासाठीही धर्म नाही. तर आमच्याच अंतरंगात असलेल्या स्वर्गाचे सुख भोगण्यासाठी, आमच्याच अंतरंगात मधून मधून ज्या नरकाग्नीच्या वाला उठतात, त्यांना शांत करण्यासाठी धर्म आहे. त्याच्यापासून स्वतःला वाचविण्यासाठी धर्म आहे. धर्म हा दृष्टीला दिसणारा आहे. प्रत्यक्ष आहे. याच जीवनासाठी आणि इहलोकासाठी आहे. तो
वर्तमानकाळासाठी आहे. ज्याने आपले वर्तमानकाळातील वर्तन सुधारले, त्याला भविष्यकाळाची चिंता करण्याची गरजच नाही. त्याचे भविष्य स्वतःच सुधारते. ज्याने हा लोक सुधारला त्याला परलोकाची चिंता नको, त्याचा परलोक आपण होऊन सुधारतो. ज्याला आपले वर्तमान सुधारता आले नाही, आपला इहलोक सुधारता आला नाही आणि केवळ भविष्याची आशा लागली आहे, जो परलोकाकडे टक लावून बसला आहे, तो स्वतःच स्वतःला धोकादायक होऊन बसतो. आपले खरे कल्याण तो साधू शकत नाही. शुद्ध धर्मापासून तो दूर जातो. धर्माला काळ नाही. म्हणजे तो याच जीवनात फळ देतो. धर्माच्या नावावर कोणी अनुष्ठान केले आणि त्याचे फळ या लोकी मिळाले नाही, विकारविहीन चित्ताच्या निर्मळतेचे खरे सुख या जीवनात मिळाले नाही, तर निश्चित समजावे की, तो कुठल्या तरी संकटात सापडला आहे. शुद्ध धर्मापासून वंचित झाला आहे. धर्म हा सर्वांना याच जीवनात सुखशांती मिळवून देण्यासाठी आहे. दृष्टीपलीकडे कुठल्या तरी दूरच्या भविष्याबद्दलच्या निरर्थक चिन्तेपासून मुक्त होण्यासाठी धर्म आहे. हाच धर्म. हीच धर्माची शुद्धता. हेच शुद्ध धर्माचे जीवन. त्याची आवश्यकता सर्व लोकांना आहे.
धर्म हा सर्वांसाठी आहे. म्हणूनच शुद्ध धर्माचा संप्रदायांशी कोणताही संबंध नाही, कोणतेही देणेघेणे नाही. शुद्ध धर्माच्या मार्गाने वाटचाल करू लागलेला वाटसरू जेव्हा धर्मपालन करतो, तेव्हा तो कोणत्यातरी खोटया, निष्प्राण रीतिरिवाजांचा संप्रदाय पाळण्यासाठी नाही; कोणत्या विशिष्ट ग्रंथातील विधी आणि नियम यांचे अनुष्ठान पुरे करण्यासाठी नाही; मिथ्या अंधविश्वासातून निर्माण झालेल्या रूढींची आणि परंपरांची शिकार बनून वाडवडलांच्या परंपरा राखण्यासाठीही नाही, तर शुद्ध धर्माचा अभ्यास करणारा माणूस आपले जीवन सुखी आणि स्वस्थ असावे, यासाठीच धर्माचे पालन करतो. धर्माचे स्वरूप चांगल्या तन्हेने समजून घेऊन धार्मिक जीवन जगण्यासाठी, धर्माला आपले व इतरांचे कल्याण करणारा असे मानून धर्माचे पालन करतो. धर्माचे स्वरूप न ओळखता, अंधविश्वासाने किंवा कोणत्या तरी अज्ञात शक्तीला संतुष्ट करण्यासाठी किंवा त्या शक्तीच्या भयाने शंकित आणि व्याकुळ होऊन तो धर्म पाळीत नाही. धर्माचे पालन करावयाचे ते दूषणांचे दमन करण्यासाठीच नाही, तर बुद्धिपुरःसर त्या दूषणांचे पूर्ण शमन व नाश करण्यासाठी. तो धर्माचे पालन केवळ आपल्या स्वतःसाठीच नाही, तर बहुजनांच्या हितासाठी, सुखासाठी, मंगलासाठी, कल्याणासाठी व मुक्तीसाठी करतो.
धर्माचे पालन करताना हे जाणले पाहिजे, की धर्म हा सर्व लोकांचा आहे, सर्वांच्या हिताचा आहे, कोणत्या विशिष्ट संप्रदायाचा, विशिष्ट वर्गाचा वा जातीचा नाही, तो तसा झाल्यास त्याची शुद्धता नष्ट होते. जोपर्यंत धर्म सर्व लोकांचा, सर्व देशांचा व सर्व काळाचा आहे तोपर्यंतच तो शुद्ध असतो.
धर्म हा सर्वांना एकाच तन्हेने कल्याणकारी, मंगलकारी आणि हितसुखकारी आहे. सरळपणे, कोणत्याही अडचणीखेरीज ग्रहण करण्यास योग्य असा आहे.
शुद्ध वातावरणात राहणे, शुद्ध-स्वच्छ हवा सेवन करणे, शरीर स्वच्छ राखणे, स्वच्छ कपडे घालणे, शुद्ध भोजन करणे, ते एवढयासाठीच की, ते माझ्या स्वतःच्या हिताचे आहे. हे केवळ माझ्याच नव्हे अगर कोणा विशिष्ट जातीच्या, वर्गाच्या किंवा संप्रदायाच्याच हिताचे आहे असे नव्हे, तर सर्वांच्या सारख्याच हिताचे आहे. मीच नव्हे तर कोणतीही व्यक्ती अशुद्ध, अस्वस्थ वातावरणात राहील, दूषित, घाणेरडी हवा पोटात घेईल, आपले शरीर व कपडे अस्वच्छ ठेवील, अस्वच्छ व दूषित भोजन घेईल, तर ती स्वतःचे स्वास्थ्य नाहीसे करील, रोगी आणि दुःखी होईल. हा सर्व लोकांना लागू पडणारा नियम आहे. कोणा एका विशिष्ट व्यक्तीला किंवा जातीला तो लागू नाही. बरोबर याच तन्हेने एखाद्याने आपले मन विकारांनी विकृत केले तर तो व्याकुळ होतो. त्याच्या शरीरातील वात-पित्त आणि कफ यांमध्ये विषमता उत्पन्न होते. तो रोगग्रस्त होतो. शरीरस्वास्थ्याचे शास्त्रीय नियम सर्वांच्या शरीराला व मनाला सारखेच लागू पडतात. प्रकृती ते नियम उल्लंघन करणारा कोण, त्याची जात कोणती, संप्रदाय कोणता हे पाहत नाही. प्रकृती ही एखाद्या विशिष्ट
संप्रदायातील व्यक्तीवर कृपा करीत नाही किंवा दुसऱ्यावर राग धरीत नाही. हिवताप हा हिवतापच. तो हिंदू नाही, बौद्ध नाही, जैन नाही, पारशी नाही, मुसलमान नाही आणि ख्रिस्ती नाही. तसेच कोयनेल हे कोयनेलच, ते हिंदू, बौद्ध, जैन, पारशी, मुसलमान, ख्रिस्ती नाही. त्याचप्रमाणे क्रोध, ईर्षा, द्वेष हे विकारही हिंदू नाहीत, बौद्ध नाहीत, जैन नाहीत, पारशी नाहीत, मुसलमान नाहीत किंवा ख्रिस्ती नाहीत, तसेच त्या विकारांपासून विमुक्त राहणे हेही हिंदू, बौद्ध, जैन, पारशी, मुसलमान किंवा ख्रिस्ती नव्हे. विकारांपासून विमुक्त राहणे हाच शुद्ध धर्म आहे. म्हणून शुद्ध धर्म हा ना हिंदू, ना बौद्ध, ना जैन, ना पारशी, ना मुसलमान, ना ख्रिस्ती. तो शुद्ध धर्मच आहे.
धर्म ही एक आदर्श जीवनशैली आहे. सुखाने जगण्याची पवित्र पद्धती आहे. शांती मिळविण्याचा निर्मळ उपाय आहे. सर्व जनांना कल्याणकारक असणारी आचारसंहिता आहे. तो सर्वांसाठी आहे.
शीलवान्, समाधिवान्, प्रज्ञावान् असणे हा काय केवळ बौद्धांचा धर्म आहे? दुसऱ्यांचा नाही? वीतराग, वीतद्वेष, वीतमोह होणे, हा काय केवळ जैनांचा धर्म आहे ? दुसऱ्यांचा नाही? स्थितप्रज्ञ, अनासक्त, जीवनमुक्त होणे, हा काय केवळ हिंदूचाच धर्म आहे ? इतरांचा नाही? प्रेम आणि करुणा यांनी उभंडून येऊन जनसेवा करणे हा काय केवळ ख्रिस्त्यांचाच धर्म आहे ? इतरांचा नाही ? जातपात यातील भेदांपासून मुक्त होऊन सामाजिक समतेचे जीवन जगणे हा काय केवळ मुसलमानांचाच धर्म आहे ? इतरांचा नाही ? धर्मपालनाचा मुख्य उद्देश आम्ही माणूस व्हावे हा आहे. चांगले माणूस व्हावे हा आहे. आम्ही चांगली माणसे झालो, तर चांगले हिंदू, चांगले बौद्ध, चांगले जैन, चांगले ख्रिस्ती होऊ. आम्ही चांगले झालो नाही, तर अगदी बौद्ध होऊन तरी काय फायदा? हिंदू, जैन, ख्रिस्ती, मुसलमान इत्यादि होऊन तरी काय फायदा ?
धर्माचे हे शुद्ध स्वरूप जाणून धर्म आचरणात आणा. आमच्या सर्वांच्या जीवनात शुद्ध धर्म जागा राहो. निस्सार सालपटांचे अवमूल्यन होवो. नाश होवो, धर्माच्या शुद्ध साराची खरी किंमत कळो. तो प्रस्थापित होवो. शुद्ध धर्म जीवनाचे अंग होऊन जावो. त्यातच आमचे खरे कल्याण, खरे मंगल सामाविलेले आहे.