अशोक गायकवाड
अलिबाग : संविधानकर्ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान यांना अभिप्रेत लोकशाही साठी निवडणूक यंत्रणेतील आपण त्यांच्याप्रती उत्तरदायी आहोत, असे मत भारत निवडणूक आयोगाचे निवडणूक खर्च निरीक्षक धिरेंद्रमनी त्रिवेदी यांनी व्यक्त केले.
नागरिक मतदारांना पारदर्शक निष्पक्ष निवडणुकीचा विश्वास देतानाच त्यांना मतदानासाठी मोकळेपणाने सहभागी होण्यासाठी सजग राहून प्रेरणा देता येईल, असे निर्देश भारत निवडणूक आयोगाचे निवडणूक खर्च निरीक्षक धिरेंद्रमनी त्रिवेदी यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात “जिल्हा निवडणूक खर्च सन नियंत्रण व व्यवस्थापन समिती” (डी इ एम सी) अंतर्गत प्रशिक्षण व आढावा बैठक झाली. याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे, जिल्हा निवडणूक प्रशिक्षण कक्षाच्या नोडल अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी जोस्ना पडियार, जिल्हा खर्च सनियंत्रण समितीचे नोडल अधिकारी तथा मुख्य लेखा व वित्त अधिकारी राजेंद्र कदम, सर्व विधानसभा मतदार संघातील सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक खर्च निरीक्षक आदी उपस्थित होते. निवडणूक खर्च निरीक्षक त्रिवेदी म्हणाले, भारत निवडणूक आयोगाच्या वतीने पारदर्शक , स्वतंत्र, निष्पक्ष निवडणूक प्रक्रिया होण्यासाठी कार्यवाही केली जात असून यामध्ये सगळ्यांचा सहकार्य आवश्यक आहे. उमेदवारांच्या निवडणूक खर्च नोंदविला जाणे गरजेचे आहे. कोणता राजकीय प्रचार खर्च आहे याचा सद्विवेक बुद्धीने विचार करून कर्तव्य पूर्ण केले जावे.
मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले, संविधानकर्ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान यांना अभिप्रेत लोकशाही साठी निवडणूक यंत्रणेतील आपण त्यांच्याप्रती उत्तरदायी आहोत. निवडणूक कालावधीमध्ये नागरिकांच्या दैनंदिन व्यवहारांना आणि सण उत्सवांना अडचण होणार नाही याची देखील काळजी घेतली गेली पाहिजे, परंतु यामध्ये राजकीय उमेदवार व पक्ष निवडणूक निवडणुकीचा प्रचार करत असतील तर त्याच्या सनियंत्रण व देखरेखीचे काम बिनचुक व बारकाईने व्हावे, असे खर्च निरीक्षक श्री. त्रिवेदी म्हणाले. या प्रशिक्षणामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी श्री.जावळे म्हणाले, जिल्ह्यामध्ये निवडणूक कालावधीमध्ये होणाऱ्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, श्री राम नवमी आदी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर यंत्रणांनी संतुलितपणे काम करणे गरजेचे आहे. कारवाईशी संबंधित महत्वपूर्ण बाबी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केल्यास अडचणी उद्भवणार नाहीत. ते म्हणाले, भारत निवडणूक आयोगाच्या वतीने निवडणूक प्रक्रियेची पाहणी करण्यासाठी जिल्ह्यातील प्रचार खर्च, कायदा सुव्यवस्था आदी बाबींची देखरेख करण्यासाठी खर्च निरीक्षक तसेच निवडणूक निरीक्षक दाखल झाले आहेत ते मतदार संघातील विविध ठिकाणी भेटी देऊन पाहणी करतील. निवडणुका निर्भयपणे होण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या निवडणूक पथकांतील अधिकारी कर्मचारी यांनी काळजीपूर्वक कर्तव्य बजावावे असे जिल्हाधिकारी जावळे म्हणाले.
याप्रसंगी जिल्हा खर्च नियंत्रण समितीचे नोडल अधिकारी कदम यांनी सादरीकरणाद्वारे सहाय्यक खर्च निरीक्षक, भरारी पथके, लेखा पथके, व्हिडिओ निरीक्षण पथक आदी निवडणूक कामकाजासाठी नियुक्त अधिकारी कर्मचारी यांच्या वरील जबाबदाऱ्या व नियमानुसार करावयाची कार्यवाही यातील तपशीलवार बारकावे समजावून दिले. याप्रसंगी जिल्ह्यातील निवडणुक यंत्रणा प्रभावी काम करण्यासाठी विधानसभा क्षेत्रात सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक खर्च निरीक्षक यांनी समन्वयाने काम करणे गरजेचे आहे असे नमूद करण्यात आले.मतदान प्रक्रिया व निवडणुकीसाठी निवडणूक खर्च निरीक्षक सहाय्यक खर्च निरीक्षक लेखापथक यांच्यासोबत व्हिडिओ निरीक्षण पथक, भरारी पथक, तक्रार निवारण व नियंत्रण कक्ष , माध्यम सनियंत्रण व प्रमाणीकरण समिती सुसज्ज सुसज्ज करण्यात आले आहे. जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीच्या मार्गदर्शनाखाली यांची कार्यवाही केली जाणार आहे. निवडणूक प्रचारासाठी उमेदवारास ९५ लक्ष रुपये मर्यादा असून तो नियमानुसार होणे गरजेचे आहे. मतदारसंघांमध्ये येणारे स्टार प्रचारक त्यांचा खर्च, आचारसंहिता नियमांचे उल्लंघन , समाज माध्यम, स्थानिक वार्तापत्रातील पेड न्यूज, प्रचारात केला जाणारा कायदेशीर व बेकायदेशीर खर्च, प्रचार वाहने, जाहिराती, पैसा व गैरबाबींचा वापर आदी अनुषंगाने अभ्यासपूर्ण सादरीकरणाद्वारे माहिती देण्यात आली. डी इ एम सी अंतर्गत निवडणूक खर्च च्या अनुषंगाने प्रशिक्षण कार्यशाळेसाठी संपूर्ण मतदार संघातील सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक खर्च निरीक्षक यांच्या अंतर्गत विविध पथक व निवडणूक शाखांमधील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.