अनिल ठाणेकर
ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात मुरबाड व शहापूर तालुक्यातील पाणी समस्या सोडविण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत टँकरग्रस्त भागात “शिवजल सुराज्य अभियान” १० डिसेंबर, २०२४ पासून राबविण्यात येत आहे. “शिवजल सुराज्य अभियान” यशस्वीपणे अमंलबजावणी व संनियत्रणासाठी जिल्हास्तरावर समिती निश्चित करण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे समिती अध्यक्ष तथा मुख्य मार्गदर्शक, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार समिती सहअध्यक्ष म्हणून कामकाज पाहणार आहेत.
कच्चे बंधारे/ वनराई बंधारे, साखळी सिमेंट बंधारे(नाला गाळ काढणे), के.टी.वेअर/ साठवण बंधारा दुरुस्ती/ नवीन कामे, पाझर तलाव/ गावतलाव दुरुस्ती/ गाळकाढणे/ नवीन कामे, खोल सलग समतळचर/ सलग समातरचर, पिण्यांच्या पाण्याची विहिर गाळ काढणे / दुरुस्ती, जलकुभ गाळ काढणे / नवीन बुडक्या, विंधण विहिरीव्दारे छतावरील पाऊसपाणी संकलन, रिचार्ज शाफट (नळयोजना विहिर स्त्रोत बळकटी करणासाठी), गॅबीयन बंधारे इ. सर्व उपाययोजना ‘शिवजल सुराज्य अभियान’ अंतर्गत राबवण्यात येणार आहेत. या सर्व कामांना नियोजित वेळेत पुर्ण करण्यासाठी श्रमदान, पाण्याचे सुयोग्य नियोजन करून गावातील पाणी पातळी वाढवण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे. १० डिसेंबर, २०२४ ते ३० सप्टेंबर, २०२५ पर्यत अभियान कालावधी असून गाव/पाडयांमध्ये गटविकास अधिकारी यांनी संबधित बीट अभियंता लघुपाटबंधारे विभाग, पाणीपुरवठा विभाग, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक यांना ग्रामपंचायत निहाय वेळापत्रकानुसार शिवार फेरी करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. गाव/ पाड्यातील पाण्याची पातळी, साठवण क्षमता, स्त्रोत, पावसाच्या पाण्याचे प्रमाण, पावसाचे पाणी साठवण सक्षमता व गावातील पाणी वापर यासंदर्भांतील सविस्तर माहिती दि. २६ डिसेंबर, २०२४ पर्यंत जिल्हा परिषदेस सादर करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी परिपत्रकाद्वारे दिले आहेत. जिल्हयात टँकरग्रस्त भागात वर्षभर ४० ते ४५ लिटर प्रत्येक व्यक्तीस पाणी पुरवठा सुरळीतपणे होण्यासाठी जिल्हा नियोजन, आदिवासी उप योजना, बिगर आदिवासी उप योजना, नावीन्य पुर्ण योजना, जलयुक्त शिवार, एमआरईजीएस तसेच जिल्हा परिषद सेस निधी इत्यादी विविध योजनाव्दारे मंजूर निधी तसेच ग्रामपंचायतस्तर पेसा, वितआयोग लोकसहभाग तसेच सीएसआर फंड इत्यादी मधुन स्त्रोत बळकटीकरण तसेच भूजल संवर्धनाच्या योजना लघुपाटबंधारे विभाग, पाणीपुरवठा विभाग, कृषी विभाग, एमआरईजीएस, ग्रामपंचायत व सामाजिक वनीकरण करून अभियान राबविण्यात येणार आहे. अभियान यशस्वीपणे राबवण्यासाठी तालुकास्तरावरुन उत्कृष्ठ नियोजन, अमंलबजावणी व सहाय्य करणाऱ्या ग्रामपंचायतीस “भूजल समृध्द ग्रामपंचायत” पुरस्कार तालुका व जिल्हास्तरावर निवड करून देण्यात येईल अशी माहिती ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून देण्यात आली. या अभियानासाठी एकूण १० प्रकारे कामाचे नियोजन करण्यात येणार असून पुर्न: भरणाचे उद्दीष्ट व पाणी साठवण करण्यासाठी शहापूर तालुक्यात विंधण विहिरीवरील छता वरील पाऊस पाणी संकलन – ४५४ , रिचार्ज शाफट – ५०, गॅगीयन बंधारा – ५०, के.टी.बंधारा – १०, वनराई बंधारे/कच्चे बंधारे – ५०, सिमेंट नाला बंधराCNB – १५ नियोजित कामे असून त्याद्वारे भूजल पुनर्भरण ३३७ दश लक्ष लिटर तर साठवण १४५ दश लक्ष लिटर पाणी उपलब्ध करून देण्यासाठी कामकाज करण्यात येणार आहे. तर मुरबाड तालुक्यात विंधण विहिरीवरील छता वरील पाऊस पाणी संकलन – १३० , रिचार्ज शाफट – ७५, के.टी.बंधारा – ५, वनराई बंधारे/कच्चे बंधारे – ३५, सिमेंट नाला बंधरा CNB – ७, युजीबी – ३ नियोजित कामे असून त्याद्वारे भूजल पुनर्भरण १४० दश लक्ष लिटर तर साठवण ८१ दश लक्ष लिटर पाणी उपलब्ध करून देण्यासाठी कामकाज करण्यात येणार आहे. शहापूर तालुक्यातील ४३ गाव, १५५ पाडे असे एकूण १९८ गाव/पाड्यात जुन २०२४ अखेर ४२ टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत होता, तर मुरबाड तालुक्यातील १७ गाव, १८ पाडे असे एकूण ३५ गाव/पाड्यात जुन २०२४ अखेर ६ टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत होता. असे एकूण २३३ गाव/पाडे टँकरग्रस्त होते तर ८२ हजार १०३ बाधित लोकसंख्या होती. ही समस्या लक्षात घेऊन शहापूर व मुरबाड या तालुक्यात टँकर मार्फत पाणी पुरवठा करण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी व लोक सहभागातून पाणी समस्या सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे.
0000