जिल्हा ‘कुष्टरोग मुक्ती’ची पुन्हा नव्याने घोषणा….!

 

सिंधुदुर्गनगरी :सिंधुदुर्ग जिल्ह्यात एप्रिल ते नोव्हेम्बर ,२४,या ७ महिन्यात तब्बल २९ कुष्टरोगाचे रुंग्ण आढळले आहेत.
यामध्ये २१ पुरुष,७ महिला व एक लहान मूल आहे. सद्या जिल्ह्यात सदरचे २९ व या आगोदरचा एक असे ३० कुष्टरोगाचे रुंग्ण उपचार घेत आहेत.
खरं तर सिंधुदुर्ग जिल्हा अस्तित्वात येण्यापूर्वी पासून आणि त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा निर्मिती नंतरही जवळ जवळ प्रत्येक वर्षी कुष्टरोगाचे रुंग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहेत. मात्र जिल्हा प्रशासन,आरोग्य विभाग दरवर्षी या रोगाच्या संपूर्ण उच्चाटनाची घोषणा करत आहे. मात्र गेल्या काही वर्षांची आकडेवारी लक्षात घेतली तर उच्चाटन सोडाच पण रुंग्ण संख्या देखील कमी होत नाही किंवा आटोक्यात येत नाही असे उपलब्ध आकडेवारीवरून दिसून येईल.
गेल्या काही वर्षातील जिल्ह्यातील रुंग्ण संख्या किती याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता ‘आमच्याकडे माहिती नाही,कुष्टरोग विभागाकडे मिळेल’ असे सांगण्यात आले.तर या विभागाकडे केवळ ८-१० वर्षाचीच आकडेवारी उपलब्ध असल्याचे दिसून आले.
गेल्या ६-७ वर्षात कुष्टरोग रुंग्ण संख्या कधी वाढते तर कधी कमी होते असेच चित्र दिसते आहे. २०१६-१७ मध्ये ही संख्या ४६ होती,२०१७-१८ (५६), २०१८-१९(५४), २०१९-२०(४४), २०२०-२१(३५), २०२१-२२(४४), २०२२-२३(५१), २०२३-२४(३५), तर गेल्या सात महिन्यातच हा आकडा २९ वर गेला आहे. तेव्हा जिल्ह्यात कुष्टरोग नियंत्रणात आहे एवढच म्हणावं लागेल. उच्चाटन तर दूरच असच चित्र आहे.
दर वर्षी कुष्टरोग रुंग्ण शोधण्याच्या मोहीमा जिल्हा प्रशासन आणि जि. प. चा आरोग्य विभाग राबवतं मात्र परिस्थितीत फारसा फरक पडलेला दिसत नाही.
दरम्यान येत्या १६ ते २० डिसेंबर दरम्यान जिल्ह्यात कुष्टरोग रुंग्ण शोध मोहीम हाती घेण्यात येणार आहे.तसेच राष्ट्रीय कुष्ट रोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत २०२७ पर्यंत शून्य कुष्टरोग जिल्हा हे ध्येय निश्चीत करण्यात आले आहे अशी घोषणा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सई धुरी यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे नव्याने केली आहे.
या पाच दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यात सर्व ठिकाणी विशेष सर्वेक्षण करण्यात येणार आहे. सदरचे सर्वेक्षण आशा व प्रशिक्षित पुरुष स्वयंसेवक यांच्याद्वारे करण्यात येणार आहे.
या शोध मोहीमेंतर्गत जिल्ह्यात अतिजोखमीच्या २६३ वस्त्यांमध्ये सुमारे ८,५०० लोकांची तपासणी करण्यात येणार आहे.
या शोध मोहीमेसाठी एक आशा कार्यकर्ती, एक स्त्री स्वयंसेविका, व एक पुरुष स्वयंसेवक अशा तिघा जणांच्या १२३ पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *