नीलम शेख
ठाणे : विद्या प्रसारक मंडळाच्या के. ग. जोशी कला आणि ना. गो. बेडेकर वाणिज्य महाविद्यालय (स्वायत्त), ठाणे येथील बी.कॉम (लेखा आणि वित्त) (BAF) विभाग यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंतर्गत बुधवार ११ डिसेंबरला एक नाविन्यपूर्ण शिक्षण उपक्रम राबविला. हिंदी आणि मराठी भाषेचा दैनंदिन कामकाजातील वापर विद्यार्थ्यांना समजावा यासाठी प्रा. श्र सुदाम अहिरराव आणि प्रा. जीवन माळी यांनी द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष रेल्वे स्टेशन अनाऊंसमेंट सेक्शन आणि पोस्ट ऑफिस येथे होणारा भाषेचा कामकाजातील उपयोग यासाठी तिथे अभ्यास भेटीचे आयोजन केले.
प्रभावी सार्वजनिक घोषणा आणि रेल्वेच्या कामकाजात सुरळीतपणे संवाद सुरु राहावा यासाठी हिंदी भाषेचे असणारे महत्त्व याबाबत विद्यार्थ्यांना माहिती मिळाली. पोस्ट ऑफिस कार्यालयात पत्रव्यवहार आणि सार्वजनिक संवादासाठी मराठी हे महत्त्वाचे माध्यम कसे काम करते याबद्दल तेथील अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. BAF विभागाच्या समन्वयिका डॉ. नीलम शेख यांनी देखील या अनोख्या कार्यक्रमाची संकल्पना आणि अंमलबजावणी करण्यात मोलाची भूमिका बजावली. पाठ्यपुस्तकांच्या पलीकडे शिकण्याची संधी विद्यार्थ्यांना या निमित्ताने मिळाली.