अनिल ठाणेकर
ठाणे : संगीतप्रेमींसाठी एक अविस्मरणीय संध्याकाळ साजरी करण्यासाठी, वैशाली माडे फाऊंडेशन प्रस्तुत  ‘नाईन्टीज पहला नशा: द एरा ऑफ लव्ह अँड रिदम’ या विशेष मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम २० डिसेंबरला  रात्री ८:३० वाजता ठाण्याच्या डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात सादर होणार आहे. यावेळी वैशाली माडे आणि अन्य गायक ९०च्या दशकातील सुरेल गाणी सादर करणार असून सरत्या वर्षात संगीतप्रेमींना एक अनोखा नजराणा अनुभवायला मिळणार आहे.
वैशाली माडे, ज्यांनी आपल्या मोहक आवाजाने लाखो श्रोत्यांची मने जिंकली आहेत. त्यांचा आवाज केवळ मराठीच नाही, तर हिंदी चित्रपटसृष्टीत देखील गाजला आहे. या कार्यक्रमात वैशाली माडे यांच्यासोबत सहगायक म्हणून मनीषा जांबोटकर आणि प्रेमकुमार यांचा सहभाग असेल, ज्यामुळे ही संगीत मैफल अधिकच रंगतदार ठरेल. तसेच संगीत संयोजनाची धुरा प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक अविनाश चंद्रचूड यांनी सांभाळली आहे. या मैफलीचे मुख्य आकर्षण म्हणजे ३५ वादकांच्या भव्य ऑर्केस्ट्राचा समावेश. तसेच सुप्रसिद्ध गायिका साधना सरगम यांच्या उपस्थितीने या मैफलीला चारचांद लागणार आहेत. या कार्यक्रमाचे व्यवस्थापन शिरीष पवार, अनुसया आर्ट्स प्रॅाडक्शन्सने केले आहे. वैशाली माडे म्हणतात, “‘पहला नशा’ हा केवळ एक संगीत कार्यक्रम नाही, तर ९०च्या दशकातील प्रेम, आनंद आणि मैत्रीच्या आठवणींना उजाळा देणारा एक जादुई अनुभव आहे. त्या काळातील गाणी आपल्या भावनांना अनोख्या भाषेत व्यक्त करायचे आणि ती आजही आपल्या हृदयात जिवंत आहेत. या कार्यक्रमाचा मुख्य हेतू हा आहे की, यातून जमा होणारी रक्कम आम्ही काही सामाजिक संस्थांना मदत म्हणून देणार आहोत. या फाऊंडेशची ही सुरूवात असून यापुढे असे अनेक कार्यक्रम करून त्यातून मिळणारी रक्कम सामाजिक संस्थांना देण्याचा आमचा मानस आहे.’’
००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *