राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये हिवताप /डेंग्यू आजाराचा प्रसार रोखण्यासाठी आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागामार्फत विशेष शिबीरांचे आयोजन केले जात असून या शिबिरांना नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. शिबिरांना भेटी दिलेल्या नागरिकांमध्ये हिवताप /डेंग्यू आजारांबाबत प्रभावीपणे जनजागृती करण्यात आली.
आज राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम, दिल्ली यांच्या संचालक डॉ. तनु जैन यांनी माँसाहेब मिनाताई ठाकरे रुग्णालय येथे भेट दिली असता हिवताप व डेंग्यू नियंत्रणाबाबत उपाययोजनांची पाहणी केली. त्यांच्यासोबत त्यांचे पथक आणि महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवा, पुणे सहसंचालक डॉ. बबीता कमलापूकर, आरोग्य सेवा मुंबई मंडळ, ठाणे उपसंचालक डॉ. अशोक नांदापुरकर तसेच सहाय्यक संचालक, कोकण भवन डॉ. बाळासाहेब सोनावणे उपस्थित होते.
केंद्रीय पथकाने नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, इंदिरानगर येथील आजच्या जनजागृती शिबिराला भेट दिली. शिबिरामध्ये घरातील व घराभोवतालील डासोत्पत्ती स्थानांची प्रात्यक्षिके बघून या नाविन्यपूर्ण शिबिराची प्रशंसा केली आणि देशातील इतर राज्यातही अशा प्रकारच्या शिबिरांचे आयोजन व्हावे या उद्देशाने त्याचे पूर्ण व्हिडीओ शूटिंग काढून घेतले.
याप्रमाणे नमुंमपा कार्यक्षेत्रात जास्तीच जास्त नागरिकांपर्यंत पोहचून जनजागृती करण्याकरिता 13 डिसेंबरला 26 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत विविध ठिकाणी जाहीर शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिरांकरिता 9983 नागरिकांनी भेट दिली असून, 1040 रक्तनमुने घेण्यात आले.
नमुंमपा कार्यक्षेत्रात हिवताप / डेंग्यू आजाराबाबत जनजागृती करण्याकरिता दिनांक 03/08/2024 ते दिनांक 13/12/2024 या कालावधीत एकुण 342 जाहीर शिबीरांचे आयोजन करण्यात आले असून 149826 नागरिकांनी या शिबिरांचा लाभ घेतला आहे. त्यामध्ये एकूण 13814 रक्त नमुने घेण्यात आले आहेत.
याशिवाय गणेशोत्सव कालावधी, नवरात्रौत्सव कालावधी व इतर धार्मिक कार्यक्रमांमध्ये हिवताप / डेंग्यू आजाराबाबत जनजागृती करण्याकरिता शिबीरांचे आयोजन करण्यात येते.
सदर शिबिरांचे वैशिष्टय म्हणजे यामध्ये ॲनॉफीलीस व एडीस डासांची उत्पत्तीस्थाने प्रत्यक्षात दाखवून, तसेच नागरिकांना डासांच्या अळ्या प्रत्यक्ष दाखवून तसेच पाणी साठवून ठेवलेले ड्रम ओढणी, धोतर किंवा साडीच्या कपड्याने बंदिस्त करणे, त्याबरोबरच घराभोवती व घरांतर्गत असणारी डासोत्पत्ती स्थानांची माहिती करून देणे, पाणी साठविण्याची भांडी व टाक्या बंदिस्त करणे व आठवड्यातून एक दिवस स्वच्छ करुन कोरड्या ठेवणे, भंगार साहित्य टायर्स इ. नष्ट करणे, छतावरील प्लास्टीक शिट, ताडपत्री यामध्ये पाणी साचू न देणे व ताप येताच त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे याबाबत नागरीकांना प्रोत्साहित करुन आवाहन करण्यात येते.
तरी आरोग्य विभागाच्या कार्यवाहीसोबतच नवी मुंबईकर नागरिकांनी घरातील व घराभोवतालची डासउत्पत्ती स्थाने नष्ट करणे तसेच आपले घर व परिसर स्वच्छ ठेवणे, आजुबाजूचा परिसर / टेरेसवरील भंगार नष्ट करणे आदी बाबींवर लक्ष दिले तर नवी मुंबईत हिवताप / डेंग्यू आजारावर आळा घालणे शक्य होईल असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.
०००००