पनवेल : महापालिका क्षेत्रातील नागरिकांचे पुढील २० वर्षांचे पाण्याचे नियोजन असलेली न्हावा शेवा पाणीपुरवठा योजना टप्पा 3ची आमदार प्रशांत ठाकूर यांनी महापालिका आयुक्त मंगेश चितळे, माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह पाणीपुरवठा अधिकार्यांसमवेत शुक्रवारी पाहणी केली. या वेळी त्यांनी वयाळ ते भोकरपाडा पाईपलाईनच्या सद्यस्थितीत असलेल्या कामाची पाहणी करून या योजनेची सर्व कामे 31 मार्चच्या आधी पूर्ण करून घ्यावी, असे निर्देश अधिकार्यांना दिले.
न्हावा शेवा पाणीपुरवठा योजना टप्पा 3 या योजनेचे काम प्रगतिपथावर आहे. यामुळे पनवेल महापालिका क्षेत्रात १०० एमएलडी पाणीपुरवठा दुपटीपेक्षा जास्त वाढून २२८ एमएलडी होणार आहे. त्यामुळे पनवेलकरांना हक्काचे पाणी मिळणार असून पुढील २० वर्षांचे सुरळीत पाणीपुरवठ्याचे नियोजन होणार आहे.पनवेलकरांचा पाणी प्रश्न कायमचा सुटावा म्हणून आमदार प्रशांत ठाकूर यांनी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केला आहे. याच संदर्भात शुक्रवारी आमदार प्रशांत ठाकूर यांनी न्हावाशेवा पाणीपुरवठा योजना टप्पा ३ या योजनेची पाहणी केली. या योजनेच्या अंतर्गत सुरू असलेल्या कामांचा आढावा या वेळी घेण्यात आला. यामध्ये वयाळ ते भोकरपाडा पाईपलाईनचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे याकरिता अधिकार्यांना सूचना देण्यात आल्या. ३१ मार्चच्या आधी ही सर्व कामे पूर्ण करावी, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिकार्यांना सांगितले.दरम्यान, आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिकार्यांसोबत वयाळ ते भोकरपाडा या पाईपलाईनची पाहणी केली. त्यांच्यासमवेत पनवेल महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक तथा भाजपचे पनवेल शहराध्यक्ष अनिल भगत, पाणीपुरवठा अधिकारी विलास चव्हाण, एमजेपीचे मुख्य अभियंता प्रशांत भांबरे, कार्यकारी अभियंता वेंगुर्लेकर, उपअभियंता वायदंडे, जेव्हीपीआरचे प्रतिनिधी उपस्थित होते.