मुंबई : मलबार हिल मतदारसंघाचे आमदार मंगल प्रभात लोढा यांनी आज पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली. आपल्या संस्कृतीच्या रक्षणार्थ आणि सन्मानार्थ लोढा यांनी संस्कृत भाषेतून शपथ घेतली.
पुन्हा एकदा मंत्री पदी निवड करून महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी जी, केंद्रीय गृहमंत्री मा अमित शाह जी व भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा जे पी नड्डा जी यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा देवेंद्र फडणवीसजी यांचे, मंगल प्रभात लोढा यांनी याप्रसंगी आभार मानले आहेत.
मलबार हिल मतदारसंघातून मंगल प्रभात लोढा सलग सात वेळा निवडून आले आहेत. २०२२ साली त्यांना प्रथमच मंत्री पदाची जबाबदारी मिळाली. मंत्रिपदाच्या पहिल्या कार्यकाळात मंगल प्रभात लोढा यांनी पर्यटन, महिला व बाल विकास आणि कौशल्य विकास विभागाची जबाबदारी सांभाळली. तसेच मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री पद देखील त्यांनी सांभाळले.
या काळात कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, नमो रोजगार मेळावे या सारख्या अनेक कल्याणकारी योजना राबवल्या गेल्या. तसेच मुंबई उपनगर जिल्ह्यातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध प्रकल्प युद्धपातळीवर पूर्ण केले गेले. येणाऱ्या काळात नागरिकांच्या सेवेसाठी अधिक ताकदीने काम करण्याचा विश्वास त्यांनी आज व्यक्त केला आहे.
0000